TOP News । महत्त्वाची बातमीआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी

रील्स-शॉर्ट्स पाहताना मेंदूत नेमकं काय घडतं? नव्या संशोधनातून धक्कादायक खुलासा

सतत स्क्रोलिंगमुळे मेंदूच्या स्वयं-नियंत्रणावर परिणाम; ग्लुटामेटची पातळी आणि आकर्षक कंटेंटशी व्यसनाचा संबंध

Short Video Brain Effect : स्मार्टफोन आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडिया, रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात अनेकांचा दिवसातील मोठा वेळ जातो. काही मिनिटांसाठी मोबाईल हातात घेतल्यानंतर तासन्‌तास स्क्रोलिंग सुरू राहते. ही सवय आता केवळ वेळ घालवण्यापुरती मर्यादित न राहता मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करणारी ठरू शकते. नव्या संशोधनातून सतत शॉर्ट व्हिडिओ पाहण्याचा मेंदूवर होणारा परिणाम समोर आला आहे.

टिकटॉक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरील रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहताना मेंदू कसा प्रतिसाद देतो, याचा अभ्यास संशोधकांनी केला. सतत शॉर्ट व्हिडिओ पाहण्याच्या सवयीचा संबंध मेंदूतील स्वयं-नियंत्रण आणि विचार प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणाऱ्या भागांच्या कार्याशी असल्याचे या संशोधनातून दिसून आले आहे.

चीनमधील झेजियांग विद्यापीठातील संशोधक युझेंग हू यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘न्यूरोइमेज’ (NeuroImage) या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तरुणांच्या fMRI आणि H-MRS स्कॅनच्या आधारे करण्यात आलेल्या या संशोधनात डिजिटल मीडियाचा मेंदूतील नियंत्रण यंत्रणा आणि आनंदाची अनुभूती देणाऱ्या यंत्रणेमधील संतुलनावर होणारा परिणाम तपासण्यात आला.

आवडीचा शॉर्ट व्हिडिओ पाहताना मेंदूतील डॉर्सल अँटिरिअर सिंग्युलेट कॉर्टेक्स (dACC) आणि डॉर्सोलॅटरल प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (dlPFC) या कॉग्निटिव्ह कंट्रोलशी संबंधित भागांच्या सक्रियतेत बदल होत असल्याचे संशोधनात आढळले. हे भाग निर्णय घेणे, लक्ष केंद्रित करणे आणि स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यांसारख्या प्रक्रियांशी संबंधित आहेत.

हेही वाचा –  लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना नियमित लाभ मिळणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोबाईलवर स्क्रोल करताना एखादा व्हिडिओ आवडला नाही, तर युजर तो लगेच स्किप करतो. मात्र, एखादा व्हिडिओ अत्यंत आकर्षक किंवा मनोरंजक वाटल्यास तो पाहण्यात अधिक वेळ जातो. अशा वेळी सतत नवीन आणि आवडीचा कंटेंट मिळण्याची अपेक्षा स्क्रोलिंगची सवय अधिक मजबूत करू शकते.

संशोधकांच्या मते, अत्यंत आकर्षक कंटेंट पाहताना मेंदूची देखरेख करणारी यंत्रणा शिथिल होऊ शकते. परिणामी व्यक्ती अधिक ‘ऑटोमॅटिक मोड’मध्ये जाऊ शकते आणि नकळत बराच वेळ स्क्रोल करत राहण्याची शक्यता वाढते.

या संशोधनात ग्लुटामेट या मेंदूतील रसायनाचाही संबंध तपासण्यात आला. न्यूरॉन्समधील संवाद, नवीन माहिती शिकणे, ती लक्षात ठेवणे आणि आठवणे यामध्ये ग्लुटामेटची महत्त्वाची भूमिका असते.

अभ्यासातील निष्कर्षांनुसार, मेंदूतील ग्लुटामेटच्या पातळीतील फरक आणि स्क्रोलिंगवरील नियंत्रण यांच्यात संबंध दिसून आला. ग्लुटामेटशी संबंधित मेंदूतील प्रक्रिया व्यक्तीला स्क्रोलिंग थांबवण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकतात, असे संशोधनातून सूचित होते.

रील्स किंवा शॉर्ट व्हिडिओ पाहणे स्वतःमध्ये घातक असल्याचा थेट निष्कर्ष या अभ्यासातून काढता येत नाही. मात्र, आकर्षक कंटेंटचा सतत आणि अनियंत्रित वापर मेंदूच्या लक्ष, स्वयं-नियंत्रण आणि निर्णय प्रक्रियेशी संबंधित यंत्रणांशी जोडला जाऊ शकतो, असे संशोधनातून दिसते.

त्यामुळे मोबाईल वापरताना वेळेची मर्यादा निश्चित करणे, अनावश्यक स्क्रोलिंग टाळणे आणि सोशल मीडिया वापरामध्ये ब्रेक घेणे उपयुक्त ठरू शकते. विशेषतः ‘फक्त पाच मिनिटे’ म्हणून सुरू केलेले स्क्रोलिंग कधी तासाभरात बदलते, याकडे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button