शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी ‘पीएम केअर्स’चा निधी वापरा; अभिजीत दिपके यांची मागणी

Abhijeet Dipke | ग्रामीण भागातील शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त शाळांच्या उभारणीसाठी पीएम केअर्स निधीचा वापर करावा, असे आवाहन ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके यांनी बुधवारी सरकारला केले.
‘‘ग्रामीण भागातील शाळांच्या पायाभूत सुविधांमधील त्रुटी अधोरेखित करण्यासाठी सीजेपीच्या वतीने १५ ऑगस्टपासून ‘शाळा ठीक करा’ मोहीम हाती घेण्यात आली आहे. शाळांपर्यंत जाणारे चांगले रस्ते, बाके आणि पिण्याच्या पाण्यासाठी विद्यार्थी आसुसले आहेत. एका लेखापरीक्षण अहवालानुसार, ३१ मार्च २०२५ रोजी ‘पीएम केअर्स’ निधीमधील एकूण शिल्लक ८,४५२ कोटी रुपये होती, जी वर्षभरापूर्वी ७,१७३ कोटी रुपये होती. २०२४-२५ या वर्षात एकूण खर्च/वितरण ८७.८५ लाख रुपये झाला, तर त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात तो १५.६ कोटी रुपये होता.
हेही वाचा
राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा बनावट प्रतिनिधी; धर्मेंद्र सोनकरवर गुन्हा दाखल!
मग हा पैसा मुलांच्या शाळांसाठी का वापरत नाही? जर सर्व सुविधांनीयुक्त एका शाळेच्या बांधकामाचा खर्च साधारण ८ कोटी रुपये पकडला, तर ८,५०० कोटी रुपयांमध्ये १,००० हून अधिक नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण शाळा बांधल्या जाऊ शकतात, मात्र असे होत नाही,’’ असे दिपके म्हणाले. त्यांनी यासंदर्भात ‘एक्स’वर चित्रफीत प्रसारित केली आहे.
महाराष्ट्रातील शाळांची स्थिती विदारक
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शाळांच्या दौऱ्याचा संदर्भ देत दिपके म्हणाले की, ‘‘येथील शाळांची स्थिती अत्यंत वाईट आहे. येथे मूलभूत सुविधा का नाहीत, असे मी प्रशासनाला विचारले असता निधीची कमतरता असल्याचे सांगण्यात आले,’’ असे ते म्हणाले. ‘‘एकीकडे निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे पीएम केअर्स निधीमध्ये ८,५०० कोटी रुपये पडून आहेत. मग हा निधी शाळांसाठी वापरला जाऊ नये का?’’ असा सवाल करत दिपके यांनी नागरिकांना पंतप्रधान मोदींकडे हा पैसा मुलांच्या शिक्षणासाठी वापरण्याची मागणी करण्याचे आवाहन केले.





