TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

भंडाऱ्यात उद्योगांना चालना; २० उपलब्ध भूखंड उद्योजकांना तातडीने देण्याचे उदय सामंतांचे निर्देश

औद्योगिक गुंतवणुकीसाठी पायाभूत सुविधा आणि प्रलंबित प्रकरणांचा आढावा; पीएम विश्वकर्मा योजनेतील ८० हजारांहून अधिक कारागिरांची नोंदणी

भंडारा : जिल्ह्यात उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी उपलब्ध औद्योगिक भूखंड उद्योजकांना तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षात उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), खादी व ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी तसेच उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सामंत बोलत होते.

भंडारा जिल्ह्यात सध्या एकूण ७ औद्योगिक क्षेत्रे असून त्यामध्ये १५७ विकसित भूखंड आहेत. त्यापैकी १३७ भूखंडांचे वाटप झाले आहे. वाटप झालेल्या भूखंडांपैकी १९ औद्योगिक घटक बंद आहेत, तर ३४ भूखंडांची मुदत संपली आहे. सध्या २० भूखंड वाटपासाठी उपलब्ध आहेत. हे भूखंड उद्योजकांना प्राधान्याने उपलब्ध करून देऊन औद्योगिक विकासाला गती द्यावी, असे निर्देश सामंत यांनी दिले.

जिल्ह्यात उद्योगवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भूखंडांची उपलब्धता, प्रलंबित प्रकरणे आणि उद्योजकांच्या अडचणी यांचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या आणि सुविधांची पूर्तता संबंधित विभागांनी समन्वयाने व विहित कालावधीत करावी, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा –  दूध-पनीरनंतर तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता खाद्यतेलाकडे; भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

बैठकीत पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ८० हजार ६६ कारागिरांची नोंदणी झाली असून, त्यापैकी १६ हजार २६६ कारागिरांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच २ हजार ९६० लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अण्णा ठाकरे यांनी दिली.

यावेळी मधकेंद्र योजनेच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. साकोली तालुक्यातील पिटेझरी हे गाव ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित करण्यात येत असून, तेथील विविध कामांच्या प्रगतीची माहिती बैठकीत घेण्यात आली.

बैठकीस खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी सावनकुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त हेमंत बदर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक विवेक पोटे, विक्रीकर विभागाच्या सहायक आयुक्त उज्वला बनाईत, खादी व ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी श्री. देवीपुत्र तसेच औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अंबलगम यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाले.

उपलब्ध औद्योगिक भूखंडांचा प्रभावी वापर, उद्योजकांना आवश्यक सुविधा आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे भंडारा जिल्ह्यात औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button