दूध-पनीरनंतर तुकाराम मुंढेंचा मोर्चा आता खाद्यतेलाकडे; भेसळ करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा
सुटे खाद्यतेल विक्रीला मनाई; मुदत संपलेले तेल रिपॅकिंग, मोहरी तेलात अनधिकृत मिश्रण आढळल्याचा FDAचा दावा

मुंबई : दूध, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात कारवाई केल्यानंतर आता अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाकडे मोर्चा वळवला आहे. ‘सेव्ह फूड, सेव्ह ड्रग, सेव्ह महाराष्ट्र’ या मोहिमेअंतर्गत खाद्यतेलाच्या गुणवत्तेची आणि निर्धारित मानकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मुंढे यांनी दिली.
खाद्यतेलाच्या तपासणीदरम्यान भेसळ आणि नियमांचे उल्लंघन केल्याचे काही प्रकार समोर आल्याचेही त्यांनी सांगितले. नोंदणी नसलेल्या काही खाद्यतेल उत्पादक कंपन्या आढळल्या असून, मोहरी तेलात अनधिकृत मिश्रण केल्याचे प्रकारही निदर्शनास आले आहेत. तसेच मुदत संपलेले तेल पुन्हा पॅक करून विकल्याचे प्रकार समोर आल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
खाद्यतेलाच्या मानकांबाबत FDAकडून ‘कम्प्लायन्स ऑर्डर’ काढण्यात येत आहे. खाद्यतेलाचे उत्पादन, पॅकेजिंग आणि विक्री करणाऱ्या सर्व आस्थापनांना हे नियम लागू असतील. किराणा दुकानदार, ऑनलाइन विक्रेते आणि उत्पादकांपासून ते अंतिम विक्रेत्यांपर्यंत सर्वांना या आदेशाचे पालन करावे लागणार आहे.सध्या खाद्यतेलाशी संबंधित ४९६ सेंट्रल लायसन्स रजिस्टर असल्याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
हेही वाचा – ‘अफरातफरी’चा भन्नाट गोंधळ! हवेत उडणाऱ्या नोटा अन् पैशांच्या मागे सुसाट धावणारी पात्रं
खाद्यतेलाची सुट्या स्वरूपात विक्री करता येत नाही, हा नियम आधीपासूनच लागू असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. खाद्यतेलाची विक्री केवळ पॅकेजिंगमध्येच करावी लागेल. किरकोळ विक्रेत्यांनीही सुटे तेल खरेदी करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
विशेषतः मोहरी तेल हे १०० टक्के मोहरी तेल म्हणूनच विकावे लागेल, त्यात अनधिकृत मिश्रण करता येणार नाही. सुट्या तेलाचा स्रोत आणि गुणवत्ता समजत नसल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला.
खाद्यतेलाचे टिनचे डबे पुन्हा वापरण्याचे प्रकारही होत असल्याचे मुंढे यांनी सांगितले. अशा प्रकारे पॅकेजिंगचा पुनर्वापर करता येणार नाही. तसेच हॉटेल आणि खाद्य व्यवसायांमध्ये तळणीचे तेल वारंवार वापरण्याच्या प्रकारांवरही FDAची नजर राहणार आहे.
“तळणीचे तेल वारंवार वापरता येणार नाही,” असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंढे यांनी हॉटेल व्यावसायिकांना दिला.
खाद्यतेलाच्या वापरात नियमांचे उल्लंघन केल्यास ७ वर्षांपासून आजन्म कारावासापर्यंतची शिक्षा होऊ शकते. भेसळ केल्यास १० लाख रुपयांपर्यंत दंड, तर दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठीही १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचे मुंढे यांनी सांगितले.
ग्राहकांनी सुटे तेल खरेदी करू नये. पॅकेज्ड तेल घेताना लेबल, सील आणि एक्सपायरी डेट तपासावी, असे आवाहन FDA आयुक्तांनी केले. घरातही तळणीचे तेल वारंवार वापरू नये. हॉटेलमध्येही वारंवार वापरलेले तेल वापरले जात असल्यास अशा ठिकाणी खाद्यपदार्थ खाणे टाळावे, असा सल्ला त्यांनी दिला.
भेसळयुक्त खाद्यतेलाचा प्रश्न केवळ ग्राहकांची फसवणूक करण्यापुरता मर्यादित नसून त्याचा थेट आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे खाद्यतेलाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.





