सोसायटी कारभारात पारदर्शकतेसाठी डॉ. सुहास कांबळे यांचा अभिनव उपक्रम
सेक्टर १२ मधील सोसायट्यांना विनामूल्य ‘सोसायटी मॅनेजर’ ॲप; रत्नदुर्ग सोसायटीत लोकार्पण

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
सोसायट्यांचा कारभार अधिक पारदर्शक, सुलभ आणि आधुनिक करण्यासाठी नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी अभिनव डिजिटल उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सेक्टर १२ मधील सर्व सोसायट्यांना कोणतेही शुल्क न आकारता ‘सोसायटी मॅनेजर’ ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या ॲपच्या विकासाचे काम ५ जुलैपासून सुरू करण्यात आले होते. अवघ्या काही आठवड्यांत ॲप तयार करून १५ ऑगस्ट रोजी रत्नदुर्ग सोसायटीमध्ये नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. टप्प्याटप्प्याने सेक्टर १२ मधील इतर सोसायट्यांनाही हे ॲप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या ॲपद्वारे सभासदांना मेंटेनन्स बिल मोबाईलवर पाहता येणार असून, ऑनलाइन बिल भरल्यानंतर तत्काळ डिजिटल पावती मिळणार आहे. सोसायटीच्या नोटिसा, सूचना आणि महत्त्वाची माहितीही ॲपवर उपलब्ध होणार आहे.
तसेच अध्यक्ष, सचिव आणि मॅनेजर यांना सोसायटीच्या जमा रकमेची व खर्चाची नोंद डिजिटल पद्धतीने करता येणार असून, त्यावर आधारित ऑटोमॅटिक बॅलन्स शीट उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सोसायटीचे अकाउंटिंग अधिक व्यवस्थित आणि पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा
बिहारमध्ये श्रावणी सोमवारी मोठी दुर्घटना! अशोक धाम मंदिरात चेंगराचेंगरी; ७ भाविकांचा मृत्यू
रत्नदुर्ग सोसायटीतील लोकार्पण कार्यक्रमात ॲपच्या सुविधांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. फ्लॅट क्रमांक १०१ चे सभासद अमर दत्ता यांच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून ऑनलाइन पावती काढून दाखवण्यात आली.
या प्रसंगी बी टाईप फेडरेशनचे अध्यक्ष बाबाजी कळमकर यांनी डॉ. सुहास कांबळे यांचा सत्कार केला. कार्यक्रमासाठी रत्नदुर्ग सोसायटीचे अध्यक्ष कैलास भुजबळ, सचिव राजेंद्र घाडगे, खजिनदार अबुसुफियान अत्तार यांच्यासह गणेश जाधव, विशाल लांबे, धनाजी पाटील, निलेश कडू, राजेंद्र तागड, श्रावण गुंजाळ आणि अनिल पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. सोसायटी व्यवस्थापनात डिजिटल प्रणालीचा वापर वाढवून पारदर्शकता आणि सुलभता निर्माण करणारा हा उपक्रम सेक्टर १२ मधील सोसायट्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
भावनिक आठवणींना उजाळा
नगरसेवक डॉ. सुहास कांबळे यांनी रत्नदुर्ग सोसायटीशी असलेल्या जिव्हाळ्याच्या आठवणींना उजाळा देत, महानगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिला पेढ्याचा बॉक्स याच सोसायटीत दिल्याचे सांगितले. यनिमित्ताने नागरिकांशी असलेला जिव्हाळा पुढील काळात अधिक दृढ करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
“सोसायटीचा कारभार हा प्रत्येक सभासदासाठी पारदर्शक, सुलभ आणि विश्वासार्ह असला पाहिजे, हा माझा कायम प्रयत्न आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोसायट्यांचे अकाउंटिंग, मेंटेनन्स आणि दैनंदिन व्यवस्थापन अधिक सोपे व्हावे, यासाठी ‘सोसायटी मॅनेजर’ ॲप उपलब्ध करून देत आहोत. सेक्टर १२ मधील प्रत्येक सोसायटीला याचा विनामूल्य लाभ मिळावा आणि सभासदांचा वेळ वाचून कारभारात अधिक पारदर्शकता यावी, हेच या उपक्रमामागचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.”
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.





