Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘निसर्ग, संस्कृती आणि सर्वसमावेशक विकासातून घडवूया सक्षम नंदुरबार’; पालकमंत्री हसन मुश्रीफ

स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्र्यांचे आवाहन; आरोग्य, शेती, शिक्षण, जलसंधारण आणि रोजगाराच्या योजनांचा आढावा

नंदुरबार : विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि आकडेवारी नव्हे, तर दुर्गम पाड्यातील रुग्णाला वेळेवर उपचार, शेतकऱ्याला आर्थिक बळ, महिलांना शिक्षणाची संधी, आदिवासी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने आणि युवकांच्या हाताला रोजगार मिळणे हा खऱ्या अर्थाने विकास आहे. हा विकास निसर्गाला सोबत घेणारा, आदिवासी संस्कृतीचा सन्मान करणारा आणि शेवटच्या गावापर्यंत पोहोचणारा असला पाहिजे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हावासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी खासदार गोवाल पाडवी, विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि हुतात्म्यांना अभिवादन केले.

मुश्रीफ यांनी सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृतकाळ हा केवळ भूतकाळातील त्यागाचे स्मरण करण्याचा काळ नसून समृद्ध, सक्षम, समताधिष्ठित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याचा संकल्प करण्याचा काळ आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेला नंदुरबार जिल्हाही विकासाच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

आरोग्यसेवेत आशादायी परिवर्तन

जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज ८०० ते ९०० रुग्णांना मोफत आणि दर्जेदार उपचार मिळत आहेत. कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अस्थिरोग उपचार, डिजिटल एक्स-रे आणि सीटी स्कॅन यांसारख्या सुविधा जिल्ह्यात उपलब्ध झाल्या आहेत. सिकलसेल निदान व संशोधन प्रयोगशाळेमुळे तपासणीसाठी नमुने जिल्ह्याबाहेर पाठविण्याची गरज कमी झाली आहे.

प्रस्तावित कर्करोग उपचार केंद्र, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, दंत व फिजिओथेरपी महाविद्यालय तसेच पदव्युत्तर शिक्षणाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर नंदुरबार उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या ‘ई-आरोग्य धमनी’ या उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार मिळाल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

हेही वाचा –  परळीत ६३४ कोटींच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा आधार

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार १७६ शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. पहिल्या हरित यादीतील ५ हजार ७७८ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत ५९ कोटी २३ लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे.

जलसुरक्षेसाठी समाधानकारक पाणीसाठा

१४ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३१४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ९९ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७२.७९ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. १५ ते २१ ऑगस्टदरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र स्वीकारण्याचे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

शिक्षणातून नव्या संधी

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रकाशवाटा २०२६’ अंतर्गत NEET, JEE Main आणि MHT-CET परीक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. ‘शिक्षणाची पुनर्संधी’ उपक्रमातून ४७० महिला व मुलींनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साधने, ग्रामीण महिलांना ‘उमेद’च्या माध्यमातून उद्योजकतेस प्रोत्साहन आणि कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवालाभ देणारा ‘नंदुरबार पॅटर्न’ असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

प्रकाशा, तोरणमाळच्या विकासाला चालना

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रकाशा येथील पायाभूत सुविधांसाठी १३८.८७ कोटी रुपयांचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. तोरणमाळच्या विकासासाठी ‘स्वदेश दर्शन’ योजनेतून ७८.०९ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे पर्यटन, स्थानिक रोजगार आणि व्यवसायाला चालना मिळेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

याशिवाय औद्योगिक क्षेत्र, वस्त्रोद्योग, सूक्ष्म व लघुउद्योग आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन युवकांसाठी स्थानिक रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.

नागरिकाभिमुख प्रशासनावर भर

नंदुरबार पोलीस दलाकडून ‘मिशन सक्षम 3.0’, तक्रार निवारण दिन, सायबर व रस्ता सुरक्षा जनजागृती यांसारखे उपक्रम राबविण्यात येत आहेत. महसूल प्रशासनातील ४०२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायदे, डिजिटल प्रशासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ही जिल्ह्यात राबविण्यात आले.

पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर आणि दरडींच्या संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी आणि समन्वयावर भर दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट प्रशासकीय कामकाजासाठी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचा सन्मान करण्यात आला. महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण आणि इतर विभागांतील उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही गौरव करण्यात आला.

शेवटी, “निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न, रोजगारक्षम, सुरक्षित आणि विकसित नंदुरबार घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संकल्प करूया,” असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button