परळीत ६३४ कोटींच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे भूमिपूजन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कोनशिला समारंभ; चालू शैक्षणिक वर्षापासून प्रवेश सुरू करण्याची घोषणा

बीड : परळी वैजनाथ येथे ६३४ कोटी रुपये खर्चाच्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचा कोनशिला समारंभ व भूमिपूजन सोहळा राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे पशुवैद्यकीय शिक्षण मिळण्याबरोबरच स्थानिक शेतकरी आणि पशुपालकांना आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे, आमदार नमिता मुंदडा, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, पोलीस अधीक्षक नवनीत कावत आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, महाराष्ट्र हा कष्टकऱ्यांचा तर मराठवाडा कष्टाची खाण आहे. शेतीला आधार देणाऱ्या पशुधनाची काळजी घेणे ही काळाची गरज आहे. या महाविद्यालयामुळे मराठवाड्यातील तसेच लगतच्या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण, प्रयोगशाळा आणि संशोधनाच्या सुविधा मिळतील.
हेही वाचा – नाशिक जिल्ह्यातील ३९ अनुकंपाधारकांना नियुक्तीपत्रे
या प्रकल्पासाठी ६३४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, सुसज्ज इमारत, वसतिगृह, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. परिसरातील ५० ते १०० गावांमधील जनावरांवर आधुनिक उपचार परळीतच उपलब्ध होतील. दूध उत्पादन वाढविणे आणि फायदेशीर शेळीपालनावरही संशोधन केले जाणार आहे.
महाविद्यालयातून केवळ नोकरी करणारे पशुवैद्यक नव्हे, तर पेट केअर क्लिनिक, डेअरी सल्लागार आणि पशुखाद्य निर्मिती यांसारख्या क्षेत्रांत रोजगार निर्माण करणारे तरुण उद्योजक तयार व्हावेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. चालू शैक्षणिक वर्षापासूनच महाविद्यालयात प्रवेश सुरू केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
महाविद्यालयाचे काम दर्जेदार आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून, ‘समृद्ध शेतकरी, सुदृढ जनावर आणि स्वावलंबी मराठवाडा’ घडविण्याचा संकल्प करण्यात आल्याचे पवार यांनी नमूद केले.
पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी या महाविद्यालयामुळे परळी परिसरात मोठा बदल घडेल, असा विश्वास व्यक्त केला. पशुपालकांना व्यवसायासाठी ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





