‘लेक लाडकी’ योजनेची प्रक्रिया सुलभ; पालकांना आता ऑनलाइन अर्जाची सुविधा
‘आपले सरकार’ पोर्टलवरून थेट अर्ज; जुन्या पात्र लाभार्थ्यांना १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत संधी

मुंबई : मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘लेक लाडकी’ योजनेची अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. आता लाभार्थी मुलींच्या पालकांना ‘आपले सरकार’ पोर्टलच्या माध्यमातून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तसेच, अर्जासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
१ एप्रिल २०२३ पासून पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना या योजनेसाठी १५ ऑगस्ट २०२७ पर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानंतर पोर्टलवर नोंदणी होणाऱ्या नवीन प्रकरणांसाठी मुलीच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे.
नव्या सुलभ प्रक्रियेत आधार क्रमांकाच्या आधारे आवश्यक माहिती ऑटो-फेच केली जाणार आहे. लाभार्थी मुलगी, तिची माता आणि पिता यांची ई-केवायसी केली जाणार असल्याने वारंवार कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच, योजनेच्या पुढील टप्प्यांतील लाभांसाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
हेही वाचा – ‘निसर्ग, संस्कृती आणि सर्वसमावेशक विकासातून घडवूया सक्षम नंदुरबार’; पालकमंत्री हसन मुश्रीफ
लाभाची रक्कम संबंधित लाभार्थ्याच्या संलग्न बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे. त्यामुळे बँक खात्याची स्वतंत्र माहिती सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. अंगणवाडी केंद्राशी संबंधित माहितीही लाभार्थ्यांना स्वतंत्रपणे भरावी लागणार नाही.
टप्प्याटप्प्याने मिळणार १ लाख १ हजार रुपये
‘लेक लाडकी’ योजनेअंतर्गत १ एप्रिल २०२३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या पात्र मुलींना आर्थिक मदत दिली जाते. मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये, पहिलीत प्रवेश घेतल्यानंतर ६ हजार रुपये, सहावीत प्रवेश घेतल्यानंतर ७ हजार रुपये, अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर ८ हजार रुपये, तर मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर ७५ हजार रुपये देण्यात येतात. अशा प्रकारे पात्र लाभार्थी मुलीला एकूण १ लाख १ हजार रुपयांचा लाभ मिळतो.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे तसेच शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न आणि अन्य पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन आणि कागदपत्रांची संख्या कमी केल्यामुळे योजना अधिक पारदर्शक, गतिमान आणि लाभार्थी-केंद्रित होईल. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक पात्र मुलींना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.





