सातबारा नसला तरी महिलांना मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषीमंत्री भरणेंची मोठी घोषणा
शेतीशी संबंधित महिलांना कृषी योजनांचा लाभ घेता येणार; दुष्काळाच्या मागणीवर भरणे म्हणाले, ‘शेतकरी अडचणीत, शासन सहकार्य करणार’

पुणे : महिलांना ‘शेतकरी’ म्हणून ओळख देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. अनेक महिलांच्या नावावर शेतीचा सातबारा नसला, तरी त्या प्रत्यक्ष शेती किंवा शेतीशी संबंधित व्यवसायात कार्यरत असतात. अशा महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळावी, यासाठी शेतकरी प्रमाणपत्र पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या माध्यमातून पात्र महिलांना शेतकरी प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्याच्या आधारे कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.
दरम्यान, राज्यातील काही भागांमध्ये गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत आहे. याबाबत बोलताना कृषीमंत्री भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाकडून परिस्थितीची माहिती घेतली जाईल, असे सांगितले.
‘दुष्काळ जाहीर करणे ही आजची गरज आहे’
राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी अडचणीत असल्याचे भरणे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आपण स्वतः पाच ते सहा जिल्ह्यांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना शासनाकडून निश्चितपणे सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीत पशुधनासाठी चारा छावण्यांबाबतही विचार केला जाईल, असे भरणे यांनी सांगितले. पशुधन आणि दुग्ध व्यवसायासंदर्भातील निर्णय दिवाळीच्या आसपास घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा – HSC Board Exam 2027 : बारावीच्या परीक्षेची तारीख जाहीर; ८ फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा
५० हजार रुपयांच्या अनुदानाचीही प्रक्रिया
राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. या योजनेसाठी सुमारे ४० हजार ८८५ कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लातूरमध्ये शेतकरी संघटनेचे रास्तारोको
दरम्यान, पावसाअभावी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा करत शेतकरी संघटनेने उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे रास्तारोको आंदोलन केले. कोरडा दुष्काळ राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली.
याशिवाय शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पीकविमा योजनेतून वगळलेल्या नुकसानीच्या बाबींचा पुन्हा समावेश करावा आणि गावनिहाय पीक कापणी प्रयोग घेण्यात यावेत, अशा मागण्याही शेतकरी संघटनेने केल्या.





