TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘प्रमाणपत्र मिळेपर्यंत अंतरवली सोडायची नाही’; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेट आणि प्रलंबित योजनांच्या प्रश्नांवर २९ तारखेला आंदोलनाचा इशारा; सरकारला २८ तारखेपर्यंतची मुदत

अंतरवली सराटी : कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी आणि मराठा समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या नागरिकांनी अर्जाची संपूर्ण माहिती घेऊन अंतरवली सराटीत यावे. प्रमाणपत्र मिळेपर्यंत अंतरवली सोडायची नाही, असे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले.

हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करूनही प्रमाणपत्र मिळत नसल्यास संबंधित अर्जदारांनीही अधिकाऱ्यांची माहिती घेऊन अंतरवलीत यावे, असे जरांगे यांनी सांगितले. अर्जदार आणि अभ्यासकांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी जीआर काढूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही, असा आरोप करत जरांगे यांनी सरकारवर टीका केली. चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. मराठा समाजाच्या प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलनाची दिशा बदलू शकते आणि गरज पडल्यास मुंबईतही आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

हेही वाचा –  विद्यार्थ्यांनी कोणत्या क्षेत्रात भरारी घ्यायची याची ध्येय निश्चिती करा – अनिल वखारिया

दरम्यान, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केलेल्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अंतरवलीत यावे, असे त्यांनी सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या प्रलंबित अर्जांबरोबरच सारथीच्या योजनांमध्ये अडचणी असलेल्या लाभार्थ्यांनीही आपली माहिती घेऊन यावे, असे आवाहन त्यांनी केले.

विदर्भातील मराठा समाजाने घराघरात बैठका घेऊन २९ तारखेला आंदोलनासाठी अंतरवलीत सहभागी व्हावे, असे जरांगे यांनी म्हटले. समाजाच्या प्रश्नांवर भूमिका स्पष्ट नसलेल्या काही अभ्यासकांवरही त्यांनी टीका केली. सरकारची बाजू मांडण्यासाठी किंवा समाजात संभ्रम निर्माण करण्यासाठी कोणी येऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, नियोजित अभ्यासकांच्या बैठकीनंतर आपण तात्पुरता डिस्चार्ज घेत असून पुढील मराठवाडा दौऱ्याची तयारी सुरू असल्याचे जरांगे यांनी सांगितले. प्रकृतीने साथ दिल्यास दौरा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button