बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला मायदेशात पराभूत करत घडवला नवा इतिहास

AUS vs BAN | नजमुल हुसेन शांतोच्या नेतृत्वाखालील बांगलादेश क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहीत ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर धूळ चारली. डार्विन येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून धुव्वा उडवला. ऑस्ट्रेलियात खेळताना बांगलादेशचा हा पहिलाच कसोटी विजय असून जागतिक क्रिकेट जगतात या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक होत आहे. ५७ धावांचे माफक आव्हान बांगलादेशने अवघ्या १ गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सचा निर्णय अत्यंत चुकीचा ठरला. स्टीव्ह स्मिथच्या अर्धशतकानंतरही ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात अवघ्या १९८ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात बांगलादेशच्या फलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी नोंदवली. तन्झीद हसनचे शानदार शतक आणि दोन महत्त्वपूर्ण अर्धशतकांच्या बळावर बांगलादेशने पहिल्या डावात ४२६ धावांचा डोंगर रचून २२८ धावांची भक्कम आघाडी घेतली. दुसऱ्या डावात कॅमेरुन ग्रीनने शतकी झुंज देत ऑस्ट्रेलियाचा एक डाव राखून होणारा नामुष्कीजनक पराभव टाळला, परंतु संपूर्ण संघ केवळ ५६ धावांचीच आघाडी घेऊ शकला.
हेही वाचा
तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! ‘विमल’च्या जाहिरात प्रकरणी शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस
Bangladesh stun Australia to register landmark first Test victory Down Under 👏#WTC27 📝: https://t.co/gIQtdBGVou pic.twitter.com/xQdTVZchm6
— ICC (@ICC) August 16, 2026
मोठ्या संघांना न जमलेली किमया बांगलादेशने केली
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाकिस्तानला गेल्या ३१ वर्षांत, दक्षिण आफ्रिकेला गेल्या १० वर्षांत आणि न्यूझीलंडला गेल्या १५ वर्षांत ऑस्ट्रेलियात कसोटी सामना जिंकता आलेला नाही. मात्र, तुलनेने दुबळ्या मानल्या जाणाऱ्या बांगलादेश संघाने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव करून ही अशक्यप्राय कामगिरी करून दाखवली आहे.





