राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा; सावरकर मानहानीचा खटला रद्द!

Rahul Gandhi | काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी दाखल झालेला मानहानीचा खटला आणि दंडाधिकाऱ्यांचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. राहुल गांधी यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी कायदेशीर नियमांनुसार आवश्यक असलेली उत्तर प्रदेश सरकारची अधिकृत मंजुरी (Sanction) मिळाली नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने हा खटला निकाली काढला.
राहुल गांधी यांनी २०२२ मध्ये ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सुनावणीदरम्यान खंडपीठाने नमूद केले की, “अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदारांच्या वकिलांनी हे स्पष्ट केले आहे की, खटल्यासाठी आवश्यक असलेली सरकारची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही परिस्थिती पाहता तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी दिलेले सर्व आदेश रद्द केले जात आहेत.”
हेही वाचा
Supreme Court quashes the summons issued by the Lucknow Magistrate Court in a criminal defamation complaint against Congress MP Rahul Gandhi for his controversial remarks against Vinayak Damodar Savarkar during ‘Bharat Jodo Yatra’ in 2022.
Supreme Court quashes the summons and…
— ANI (@ANI) August 14, 2026
ठाण्यातही नोंदवला गेला होता गुन्हा
राहुल गांधी यांच्या या विधानामुळे नागरिकांच्या आणि देशभक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील शिवसेना पदाधिकारी वंदना डोंगरे यांनीही राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ५०० (मानहानी) आणि ५०१ (मानहानीकारक मजकूर छापणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र, उत्तर प्रदेशातील खटल्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल राहुल गांधींसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.





