TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिकमध्ये शिवसेनेची संघटनबांधणीसाठी नवी रणनीती; १३ तालुकाप्रमुखांना नव्या गाड्या

आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने वाहनांची व्यवस्था; गावागावांत संपर्क वाढवून पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर

नाशिक : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने (एकनाथ शिंदे) संघटनबांधणीला वेग दिला आहे. ग्रामीण भागातील पक्षाचा संपर्क वाढवण्यासाठी जिल्ह्यातील १३ तालुकाप्रमुखांना नव्या मोटारी देण्याची योजना आखण्यात आली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने ही वाहने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे.

या वाहनांचा वापर पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी करण्यात येणार असून, तालुकाप्रमुखांना गावोगावी दौरे करून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. वाहनांचा वापर पक्षकार्यासाठीच केला जातोय का, यासाठी तालुकाप्रमुखांच्या दैनंदिन कामाचा अहवालही घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

‘शिवसेना आपल्या दारी’चा संदेश

या वाहनांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे तसेच ‘शिवसेना आपल्या दारी’ असा संदेश देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि गावोगावी नियमित संपर्क साधण्यासाठी या वाहनांचा उपयोग करण्याचे नियोजन आहे.

पक्षाची संघटना तळागाळापर्यंत पोहोचवणे, नागरिकांशी थेट संवाद वाढवणे तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा –  PCMC: ड प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी नवीन अग्निशमन केंद्राच्या कामाला गती द्या!

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचाली

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणात विविध पक्षांचे प्रभावक्षेत्र असताना आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संघटनात्मक तयारीला सुरुवात केली आहे. तालुकाप्रमुखांना वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यामागे ग्रामीण भागातील संपर्क अधिक व्यापक करण्याचा उद्देश असल्याचे वृत्त आहे.

या उपक्रमाची सुरुवात नाशिक जिल्ह्यात करण्यात येत असून, पुढील काळात त्याचा विस्तार करण्याबाबतही पक्षाकडून विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button