मोशी कचरा दुर्घटनेतील मृत कामगाराच्या पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

मोशी | मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या कामगाराच्या पत्नीने आत्महत्या केल्याप्रकरणी तिच्या सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नातील मानपान, दोन मुली झाल्याचे कारण तसेच पतीच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या मदतनिधीच्या वाटपावरून झालेल्या वादातून तिचा मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३५२, ३(५) तसेच भादंवि कलम ३०६, ५०४ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेच्या लग्नात मानपान केला नाही आणि खर्च केला नाही, तसेच तिला दोन मुलीच झाल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून वारंवार टोमणे मारले जात होते, असा आरोप आहे. त्याचबरोबर तिच्या पतीचा मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झाल्यानंतर मिळणाऱ्या मदतनिधीच्या पैशांच्या वाटपावरूनही कुटुंबात वाद होत होता.
हेही वाचा
या कारणांवरून मयत महिलेचा वारंवार मानसिक छळ करण्यात आला. तसेच शिवीगाळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी सासरच्या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये दोन महिला, स्वप्निल सर्जेराव गायकवाड आणि सायली स्वप्निल गायकवाड यांचा समावेश आहे. सर्व आरोपी मोशीतील संजय गांधीनगर परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१३ ऑगस्ट २०२६ रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलिस करीत आहेत.





