Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

“मला तुमच्या मदतीची गरज आहे”; सोनम वांगचुक यांचे देशवासीयांना आवाहन

नवी दिल्ली | देशातील राजकीय व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी आणि निष्कलंक नेतृत्वाची निवड करण्यासाठी लडाखचे ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देशवासीयांना ‘शांततापूर्ण क्रांती’चे थेट आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला समाजमाध्यमावर प्रसारित केलेल्या एका संदेशात त्यांनी, २०४७ पर्यंत भारताला सन्मानजनक व समृद्ध राष्ट्र बनवण्यासाठी ‘दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्या’ची हाक देत नागरिकांकडून चारित्र्यसंपन्न नेत्यांची नावे सुचवण्याची विनंती केली आहे.

सोनम वांगचुक यांनी लोकप्रतिनिधींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर अत्यंत तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सध्या देशातील जवळपास निम्म्या खासदारांवर गुन्हे दाखल असून, त्यातील सुमारे एक तृतीयांश खासदारांवर हत्या, बलात्कार आणि अपहरण यांसारखे अतिगंभीर आरोप प्रलंबित आहेत. यामुळे जनतेचा नेत्यांवरील विश्वास उडाला असून, सध्या देशात निर्माण झालेली ‘विश्वासार्हतेची तूट’ ही सर्वात मोठी समस्या बनल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी केवळ विचारवंतच नव्हे, तर निःस्वार्थी आणि निर्भय नागरिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

‘मुंबईच्या दळणवळणाला गतिमानतेचा ‘बूस्टर’ मिळणार’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला जाहीर पाठिंबा

सोनम वांगचुक यांनी स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार व पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आंदोलक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. झारखंडमध्ये JPSC आणि JSSC परीक्षांमधील घोटाळ्यांविरोधात रांची येथे आमरण उपोषणाला बसलेले विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांच्याशी त्यांनी चर्चा केली व पाठिंबा दिला. यापूर्वी जून महिन्यात दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनातही वांगचुक यांनी सहभाग नोंदवून आमरण उपोषण केले होते.

सोनम वांगचुक यांचे देशवासीयांना आवाहन

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला संदेश देताना सोनम वांगचुक यांनी नागरिकांना आपल्या भागातील किमान एका चारित्र्यवान, निःस्वार्थी आणि निर्भय व्यक्तीचे नाव सुचवण्याचे आवाहन केले आहे. लडाखच्या दुर्गम भागात असल्याने संपूर्ण देशातील निष्कलंक नेतृत्वाची माहिती मिळवणे कठीण असल्याचे सांगत, २०४७ पर्यंत सक्षम भारत घडवण्यासाठी आणि भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला पर्याय उभा करण्यासाठी एकत्र येऊन शांततापूर्ण मार्गाने लढा देण्याची साद त्यांनी घातली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button