ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी आणखी गोड; सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ

8.33 टक्के प्रथा बोनस कायम; पाच वर्षांचा करार

महापालिका स्थायी समिती सभेत अध्यक्ष अभिषेक बारणे यांची मंजुरी

पिंपरी | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अधिक आनंदाची ठरणार आहे. दरवर्षी देण्यात येणाऱ्या 8.33 टक्के प्रथा बोनससोबत सानुग्रह अनुदानात ५ हजार रुपयांची वाढ करून ते २५ हजारांऐवजी ३० हजार रुपये देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तसेच, पुढील पाच वर्षांसाठी म्हणजेच सन 2025-26 ते 2029-30 या कालावधीसाठी बोनस व सानुग्रह अनुदान देण्याचा करार करण्यासही स्थायी समिती सभेचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी मान्यता दिली आहे.

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कर्मचारी महासंघाने दिवाळी प्रथा बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत पाच वर्षांचा करार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार कामगार कल्याण मंडळाने प्रस्ताव स्थायी समिती सभेपुढे मांडला. या प्रस्तावावर चर्चा करताना स्थायी समितीने केवळ प्रस्तावाला मंजुरी देण्यापुरते मर्यादित न राहता सानुग्रह अनुदानाची रक्कम २५ हजारांवरून ३० हजार रुपये करण्याची उपसूचना मंजूर केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत त्यांच्या आर्थिक लाभात वाढ करण्याची भूमिका अध्यक्ष बारणे यांनी घेतली. उपसूचनेसह हा प्रस्ताव आता अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आला आहे.

हेही वाचा

“सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” जनजागृती मोहीम आणि एमआयटी एसीएससी कॉलेजचा स्थापना दिन उत्साहात साजरा

सहा हजारांहून अधिक कर्मचा-यांचे ‘कल्याण’

महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी, तसेच शिक्षण विभाग आणि वैद्यकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्यासह निवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही प्रथा बोनस व सानुग्रह अनुदानाचा लाभ दिला जातो. पाच वर्षांचा करार झाल्यास दरवर्षी बोनस व अनुदानाबाबतची अनिश्चितता कमी होऊन कर्मचाऱ्यांना आर्थिक नियोजन करता येणार आहे. महापालिकेत सहा हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. मागील वर्षी दिवाळी बोनस व संबंधित खर्चासाठी महापालिकेने सुमारे ६२ कोटी रुपये खर्च केले होते. कर्मचा-यांच्या हितासाठी सानुग्रह अनुदानात भरघोस वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या लाभात कपात नाही

स्थायी समिती सभेचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्या भूमिकेमुळे कर्मचारी हिताला प्राधान्य देत बोनसची परंपरा कायम ठेवण्याबरोबरच सानुग्रह अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामाचा आणि योगदानाचा विचार करून त्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पाच वर्षांचा करार आणि सानुग्रह अनुदानातील वाढ यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काळात अतिरिक्त आर्थिक आधार मिळणार असून, पुढील काही वर्षांसाठी लाभाची निश्चितता निर्माण होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button