ताज्या घडामोडीपाटी-पुस्तकपिंपरी / चिंचवड

“सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” जनजागृती मोहीम आणि एमआयटी एसीएससी कॉलेजचा स्थापना दिन उत्साहात साजरा

आळंदी | एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी येथे महाविद्यालयाचा स्थापना दिन “सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा” या जनजागृती मोहिमेसह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यामध्ये जबाबदार डिजिटल वर्तनाबाबत जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाला एकूण सुमारे ७०० सहभागींनी उपस्थिती लावली.

या कार्यक्रमास पोलीस अधिकारी सौ. वर्षा शिंदे आणि सौ. वंदना शिंदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. बी. वाफारे, उपसंचालक डॉ. अक्षदा कुलकर्णी आणि डॉ. मानसी अतितकर तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. अमित तळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शुभप्रसंगी विद्यार्थी परिषद, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) स्वयंसेवकांनी सादर केलेली पथनाट्य (स्किट). सायबर फसवणुकीचे विविध प्रकार — बनावट कॉल्स, ओटीपी घोटाळे, फिशिंग लिंक्स आणि सोशल मीडियावरील धोके — या स्किटद्वारे अत्यंत प्रभावीपणे व मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांना सायबर सुरक्षेचा संदेश सहज समजण्यास मदत झाली आणि उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

हेही वाचा

यशवंतनगरातील सर्व्हिस रोडची दुरुस्ती; नागरिकांना दिलासा

याशिवाय “स्पॉट द स्कॅम चॅलेंज”, “सायबर मिथ व्हर्सेस फॅक्ट” यांसारख्या परस्परसंवादी उपक्रमांद्वारे बनावट ईमेल, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक व क्यूआर कोड फसवणुकीबाबत विद्यार्थ्यांना सजग करण्यात आले. तसेच “सायबर सुरक्षा प्रतिज्ञा फलक” उपक्रमांतर्गत उपस्थितांनी सुरक्षित डिजिटल वर्तनाची शपथ घेतली.

या प्रसंगी “सायबर सिक्युरिटी हँडबुक” चे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना क्यूआर कोडद्वारे हे हँडबुक डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायबर वॉरियर क्लब, आयटी/सायबर सेल, एनएसएस स्वयंसेवक व विद्यार्थी स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button