“झुरळांची पैदास गटारातच होते!”; ‘जनरेशन गटर’ वक्तव्यावर खासदार कंगना रणौतचे वादग्रस्त स्पष्टीकरण

नवी दिल्ली | दिल्लीतील जंतरमंतर येथे पार पडलेल्या नीट (NEET) पेपरफुटीविरोधातील आंदोलकांवर ‘जनरेशन गटर’ अशी टीका करणाऱ्या खासदार व अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या वक्तव्यावर वादग्रस्त स्पष्टीकरण दिले आहे. मी संपूर्ण तरुण पिढीला गटरछाप म्हटले नव्हते. जे स्वतःला ‘कॉक्रोच’ (झुरळ) म्हणवून घेतात, त्यांनाच मी ते म्हणाले होते. झुरळांची पैदास गटारातच होते, त्यामुळे स्वतःला झुरळ मानणाऱ्यांना मी गटरछाप म्हटले तर त्यात काय चूक आहे? असा सवाल करत कंगनाने आपल्या आधीच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे.
जून ते जुलै दरम्यान जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन झाले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तीव्र आणि अश्लाघ्य भाषेचा वापर करण्यात आला होता. २५ जुलै रोजी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, आंदोलनातील भाषेवरून कंगनाने आंदोलकांना ‘जनरेशन गटर’ म्हणत तीव्र शब्दांत ट्रोल केले होते. यावरून तिच्यावर चोहोबाजूंनी प्रचंड टीका झाली होती.
हेही वाचा
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे ३१९ कोटी रुपये
टीकेला उत्तर देताना कंगना पुढे म्हणाली, “माझ्या ट्विटमध्ये मी स्पष्टपणे ‘काही लोक’ असा उल्लेख केला होता. जे स्वतःला झुरळ मानत नाहीत, त्यांना मी काहीच बोललेले नाही. पण ज्यांची मानसिकता आणि वर्तनच तसे आहे, त्यांची पैदास गटारातलीच आहे. मी रील्स पाहून हादरले होते. या अशा मुली अभ्यासात चांगल्या नाहीत आणि त्या इतक्या भ्रष्ट आहेत की गृहिणीही होऊ शकत नाहीत,” असे सांगत तिने आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला.
कंगना रणौतचे मूळ वादग्रस्त वक्तव्य आणि स्पष्टीकरण
नीट पेपरफुटी आंदोलनादरम्यान आंदोलकांनी पंतप्रधान मोदींविरोधात वापरलेल्या अश्लाघ्य भाषेवर कंगना रणौतने तीव्र आक्षेप घेतला होता. “तुम्ही स्वतःला झुरळ म्हणवून घेता आणि तुमची मानसिकताही तशीच कुरुप आहे, त्यामुळे मी तुम्हाला ‘जनरेशन गटर’ म्हणते,” अशी टीका कंगनाने केली होती. व्यापक विरोधानंतर स्पष्टीकरण देताना तिने, “स्वतःला कॉक्रोच म्हणवणाऱ्यांची पैदास गटारातच होते, त्यामुळे मी संपूर्ण देशवासी किंवा सर्व तरुणांना गटरछाप म्हटले नव्हते,” असा दावा केला आहे.





