‘लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचे ३१९ कोटी रुपये

मुंबई | ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनुसूचित जाती घटकातील पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा आर्थिक लाभ वेळेत देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत येणाऱ्या या घटकासाठी महिला व बालविकास विभागाकडे ३१९ कोटी ५३ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने बुधवारी मंजुरी दिली आहे. २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या रक्षाबंधन सणापूर्वीच महिलांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग व्हावी, या उद्देशाने प्रशासनाकडून ही कार्यवाही तातडीने करण्यात आली आहे.
योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची पडताळणी ३० एप्रिल रोजी पूर्ण झाली आहे. एकूण २ कोटी ४७ लाख अर्जदारांपैकी पडताळणीअंती १ कोटी ६६ लाख महिला पात्र ठरल्या आहेत, तर सुमारे ८१ लाख अर्ज अपात्र ठरले आहेत. येत्या काळात केवळ ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या महिलाच या योजनेतून अपात्र ठरणार आहेत. पात्र महिलांना दरमहा निधी वाटपासाठी राज्य सरकारला सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा निधी लागतो. यंदाच्या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती घटकासाठी ३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून, त्यातील जुलै महिन्याचा ३१९.५३ कोटींचा हप्ता सचिवांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नव्या बोधचिन्हाला स्थायी समितीची मंजुरी
निधीचा काटकसरीने वापर करण्याचे निर्देश
सामाजिक न्याय विभागाकडून वर्ग करण्यात आलेल्या या निधीचे वितरण आणि खर्च करताना संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी काटकसरीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. उपलब्ध निधी याच आर्थिक वर्षात खर्च होईल याची दक्षता घेण्याचे तसेच निधीचा वापर पूर्ण झाल्यानंतर त्याचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.





