पुणे-नाशिक रेल्वेसाठी चाकणमध्ये चक्काजाम!
मूळ मार्ग पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय आंदोलन; चाकणमध्ये आंदोलक-पोलिसांमध्ये जोरदार झटापट

चाकण : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा मूळ मार्ग पूर्ववत करावा, या मागणीसाठी रविवारी (9 ऑगस्ट) क्रांती दिनाचे औचित्य साधून उत्तर पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी तीव्र चक्काजाम आंदोलन करण्यात आले. चाकण येथील तळेगाव चौकात खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे-नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करणारे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.
महामार्गावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी बळाचा वापर करत रोखले. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. मात्र, त्यानंतरही आंदोलकांनी महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यामुळे काही काळ चाकण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सुमारे 15 मिनिटे झटापट
चाकणमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस बळाचा वापर करत कार्यकर्त्यांना महामार्गावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. आंदोलक आणि पोलिसांमध्ये सुमारे 15 मिनिटे झटापट सुरू होती.
चाकणमधील यापूर्वीच्या आंदोलनांचा इतिहास लक्षात घेता, कोणत्याही परिस्थितीत महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली होती. सुरुवातीला माणिक चौक येथे जमलेले आंदोलक पुणे-नाशिक महामार्गाच्या दिशेने निघाल्यानंतर पोलिसांनी त्यांना तळेगाव चौकात एका बाजूला आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना घेराव घालत महामार्गावर जाण्यापासून रोखले.
आमदार बाबाजी काळेंना आंदोलनस्थळावरून बाजूला केले
यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली. अखेरीस महामार्गावर आलेल्या आंदोलकांना आमदार बाबाजी काळे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर पोलिसांनी आमदार काळे यांना आंदोलनस्थळावरून बाजूला केले. पुढे पोलिसांनी आंदोलकांना महामार्गावरून हटवत वाहतूक पूर्ववत केली.
“मूळ मार्गच कायम राहावा”
यावेळी आमदार बाबाजी काळे म्हणाले, “पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प सुमारे 16 हजार कोटी रुपयांचा आहे. मात्र, जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील जागतिक दर्जाच्या ‘जीएमआरटी’ दुर्बिणीला धोका निर्माण होत असल्याचे कारण देत रेल्वे मंत्रालयाने मूळ मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला.”
पुणे-चाकण-राजगुरुनगर-मंचर-नारायणगाव-आळेफाटा-संगमनेर-सिन्नर-नाशिक असा मूळ मार्ग प्रस्तावित होता. मात्र, हा मार्ग रद्द करून रेल्वे मंत्रालयाने नाशिक-शिर्डी-पुणतांबा आणि अहिल्यानगर-चाकण अशा पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण केले आहे.
या निर्णयामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. मूळ मार्ग कायम ठेवण्याच्या मागणीसाठी चाकणपासून सिन्नरपर्यंत नागरिकांनी विविध ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.
सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग
या आंदोलनादरम्यान आमदार बाबाजी काळे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पुणे-नाशिक रेल्वेचा मूळ मार्ग कायम ठेवावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
या सर्वपक्षीय आंदोलनात भाजप, शिंदे गटाची शिवसेना, ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच विविध गावांचे सरपंच, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.





