प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान
पर्यावरण संवर्धन व संवेदनशीलतेचा संदेश

पिंपरी-चिंचवड | प्रियदर्शनी स्कूल, मोशी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण आणि अभिवादनाने झाली. याप्रसंगी विद्यार्थी व शिक्षकांनी गांधीजींच्या सत्य, अहिंसा, साधेपणा आणि स्वच्छतेच्या विचारांचे स्मरण केले.
जयंतीनिमित्त शाळेत विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले, ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या अभियानाची सुरुवात विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या दप्तराच्या स्वच्छतेपासून केली. त्यानंतर वर्गखोल्या, शाळेचा परिसर आणि आजूबाजूचा परिसर विद्यार्थ्यांनी श्रमदानातून चकाचक केला. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, ओला व सुका कचरा वेगळा करणे आणि प्लास्टिकचा वापर टाळणे याविषयी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
हेही वाचा
कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय धैर्याचा सन्मान; ‘मॅनकाइंड’ फार्माकडून १ कोटी रुपयांचे इनाम
स्वच्छतेसोबतच विद्यार्थ्यांमध्ये दया, करुणा आणि प्राणी-पक्ष्यांप्रती संवेदनशीलता रुजावी, यासाठी पक्ष्यांना दाणे व पाणी देण्याचा उपक्रमही राबवण्यात आला. या माध्यमातून सजीवांप्रती प्रेम आणि माणुसकी जपण्याचा संदेश देण्यात आला.
“स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनली पाहिजे,” असा संदेश शिक्षकांनी दिला. विद्यार्थ्यांनी “स्वच्छता हीच सेवा” या भावनेतून स्वतःचे घर, शाळा आणि परिसर कायम स्वच्छ ठेवण्याचा आणि समाजात स्वच्छतेचा प्रसार करण्याचा संकल्प केला. गांधीजींच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून आदरांजली वाहत हा उपक्रम उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.





