पिंपरी-चिंचवडमध्ये राँग साईडचा धुमाकूळ
पीएमपी बसचालकांची कसरत; वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका वाढला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक चौकांमध्ये वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. दुचाकीस्वार आणि रिक्षाचालक विरुद्ध दिशेने वाहन चालवत थेट चौकात प्रवेश करत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. या बेशिस्त वाहतुकीचा मोठा फटका पीएमपी बससेवेला बसत असून, मोठ्या बस वळविताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विरुद्ध दिशेने अचानक समोर येणाऱ्या दुचाकी आणि रिक्षांमुळे बसचालकांना वारंवार बस थांबवावी लागत आहे. प्रसंगी बस मागे-पुढे घेऊन मार्ग मोकळा करावा लागत असल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. त्याचा परिणाम बसमधील प्रवाशांच्या वेळेवरही होत असून, मागील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.
पीएमपी बसचालकांची मोठी कसरत
मोठ्या आकाराच्या पीएमपी बसला चौकातून वळण घेताना विशेष काळजी घ्यावी लागते. मात्र, विरुद्ध दिशेने अचानक दुचाकी किंवा रिक्षा आल्यास बसचालकांसमोर मोठी अडचण निर्माण होते. वाहन थांबवून पुन्हा मागे-पुढे करावे लागत असल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढते.
वाहतूक पोलिस नेमके कुठे?
भर चौकात खुलेआम नियमभंग सुरू असतानाही वाहतूक पोलिसांची प्रभावी उपस्थिती अनेकदा दिसून येत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. सीसीटीव्ही आणि ई-चलन प्रणाली उपलब्ध असतानाही एकाच ठिकाणी वारंवार नियमभंग होत असेल, तर त्यावर प्रभावी कारवाई का होत नाही?, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
अपघाताची वाट पाहताय का?
विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचा प्रकार केवळ वाहतूक कोंडीपुरता मर्यादित नसून, तो गंभीर अपघाताला आमंत्रण ठरू शकतो. विशेषतः मोठ्या पीएमपी बस आणि दुचाकी-रिक्षांमध्ये अचानक संघर्ष होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अपघात झाल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच कठोर उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रशासनाकडून विशेष मोहिमेचे आश्वासन
विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच चौकातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
काय उपाययोजना आवश्यक?
- गर्दीच्या वेळेत चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी.
- विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी.
- सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चलन प्रणाली प्रभावीपणे राबवावी.
- राँग साईड प्रवेशाच्या ठिकाणी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर आणि दिशादर्शक फलक बसवावेत.
- पीएमपी बसच्या वळणासाठी स्वतंत्र आणि अतिक्रमणमुक्त जागा उपलब्ध करून द्यावी.
- वाहतूक नियमांबाबत जनजागृती मोहीम राबवावी.
- वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव पाठवावा.
शहरातील वाढती वाहतूक आणि वाहनांची संख्या पाहता नियमांचे पालन करणे ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर प्रत्येक वाहनचालकाची जबाबदारी आहे. काही सेकंद वाचविण्यासाठी राँग साईडने वाहन चालविण्याची घाई भविष्यात एखाद्याच्या जीवावर बेतू नये, यासाठी आता कठोर अंमलबजावणीची गरज आहे.
“पीएमपी बस वळवताना सर्वांत मोठी अडचण म्हणजे विरुद्ध दिशेने अचानक येणाऱ्या दुचाकी आणि रिक्षा. मोठी बस असल्यामुळे आम्हाला वाहन थांबवून वारंवार मागे-पुढे करावे लागते. त्यामुळे बसला उशीर होतो, वाहतूक कोंडी वाढते आणि प्रवाशांनाही नाहक त्रास सहन करावा लागतो. नियम पाळले तर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते.”
— पीएमपी बसचालक
“अशा प्रकारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. चौकातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तसेच पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात येईल. नागरिकांनीही काही क्षणांचा वेळ वाचविण्याच्या नादात स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये.”
— अमित डोळस, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, पिंपरी-चिंचवड





