क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटक

Abishek Porel Arrested | आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभिषेक पोरेल या युवा यष्टीरक्षक-फलंदाजाला लैंगिक शोषण व ब्लॅकमेलिंगच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सौगत भट्टाचार्य यांनी हुगळीतील मगरा पोलीस ठाण्याला अभिषेक पोरेलसह आणखी एका आरोपीला तातडीने अटक करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. या प्रकरणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीने दोघांवर बलात्कारासह खाजगी फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पीडित विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार, प्रेमाचे नाटक करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आले आणि तिचे खाजगी फोटो इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले जात होते. हे आक्षेपार्ह फोटो आरोपींच्या मोबाईलमध्ये असल्याने ते तात्काळ जप्त करण्याची मागणी पीडितेच्या वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने या मुद्द्याची गंभीर दखल घेत, इलेक्ट्रॉनिक उपकरणांमधील डेटा अन्यत्र कुठेही प्रसारित होणार नाही याची खबरदारी घेत आरोपींचे फोन व उपकरणे तात्काळ जप्त करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. केवळ तक्रारदार मुलगीच नव्हे, तर इतरही काही मुलींचे खाजगी फोटो काढून त्यांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा संशय न्यायालयात व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा
‘नोकरी मागणारे नव्हे, नोकरी देणारे बना’ : शैलेश शहा
न्यायालयाचे पोलिसांना कडक ताशेरे
गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून मोबाईल जप्त न करणे आणि अटकेबाबत योग्य पावले न उचलल्याने न्यायालयाने विचारणा केली. त्यावर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगत न्यायालयात अहवाल सादर केला. प्रकरणाच्या सुनावणीवेळी आरोपींच्या बाजूने कोणीही उपस्थित नव्हते. न्यायालयाच्या कडक भूमिकेनंतर पोलिसांनी या प्रकरणात अटकेची मोठी कारवाई केली आहे.
कोण आहे अभिषेक पोरेल?
२३ वर्षीय अभिषेक पोरेल हा बंगालचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज आहे. वृद्धिमान साहाच्या निवृत्तीनंतर त्याने बंगाल संघाच्या यष्टीरक्षणाची सूत्रे सांभाळली आहेत. त्याने ३२ प्रथम श्रेणी सामन्यांत १४०८ धावा केल्या असून ११४ झेल टिपले आहेत. २०२३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या पोरेलने २०२४ च्या हंगामात १४ सामन्यांत ३२७ धावा आणि २०२५ च्या हंगामात १३ सामन्यांत ३०१ धावा कुटल्या होत्या. मात्र, यंदाच्या हंगामात त्याला खेळण्याची कमी संधी मिळाली होती.





