जिंदाल स्टेनलेस आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार
टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष एमआयटी येथे विशेष अभ्यासक्रमास सुरुवात

स्टेनलेस स्टीलचा वापर, गंजरोधक क्षमता आणि शाश्वत बांधकामाबाबत विद्यार्थ्यांना मिळणार प्रत्यक्ष ज्ञान
पुणे | भूमिगत पायाभूत सुविधांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन जिंदाल स्टेनलेस आणि पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) यांनी टनेल इंजिनिअरिंगसाठी विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. ‘स्टेनलेस स्टील : टनेल आणि भूमिगत बांधकामासाठी शाश्वत, हरित आणि नाविन्यपूर्ण सामग्री’ असे या अभ्यासक्रमाचे नाव आहे.
या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना बोगदा बांधकामात स्टेनलेस स्टीलचा वापर, त्याची गंजरोधक क्षमता, योग्य ग्रेडची निवड, डिझाइन, वेल्डिंग, फॅब्रिकेशन तसेच सामग्रीच्या संपूर्ण जीवनचक्राचा खर्च आणि शाश्वततेबाबत व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. या अभ्यासक्रमाची पहिली तुकडी १० ऑगस्टपासून सुरू झाली असून, सध्या २५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
देशात मेट्रो रेल्वे, महामार्ग, रेल्वे, जलविद्युत आणि पंप्ड स्टोरेज प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. यातील अनेक प्रकल्पांसाठी बोगदे आणि इतर भूमिगत संरचना उभारल्या जात आहेत. भूजल, आर्द्रता आणि गंज निर्माण करणाऱ्या वातावरणातही या संरचना दीर्घकाळ टिकणे आवश्यक आहे. त्यामुळे टिकाऊ आणि गंजरोधक सामग्रीचा योग्य वापर करण्याचे ज्ञान असलेल्या अभियंत्यांची गरज वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या सामंजस्य कराराची मुदत तीन वर्षांची आहे. अभ्यासक्रमाची निर्मिती, अध्यापन आणि वेळोवेळी त्यात सुधारणा करण्यासाठी दोन्ही संस्थांकडून संयुक्तपणे काम केले जाणार आहे.
जिंदाल स्टेनलेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण खुल्बे, जिंदाल स्टेनलेस स्टीलवे लिमिटेडचे बिझनेस युनिट प्रमुख मधुर गुप्ता आणि स्ट्रॅटेजिक बिझनेस अँड टनेल इन्फ्राचे प्रमुख संदीप सिंह यांनी कंपनीतर्फे करारावर स्वाक्षरी केली. MIT-WPUतर्फे फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे अधिष्ठाता डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्राध्यापिका व कार्यक्रम संचालक डॉ. शांतिनी ए. बोकील, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर टनेलिंग अँड अंडरग्राउंड कन्स्ट्रक्शनचे संचालक आणि टनेल इंजिनिअरिंग कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. संदीप पोटणीस, तसेच सहाय्यक प्राध्यापक व शैक्षणिक समन्वयक डॉ. अभयसिंहा जी. शेलाके यांनी स्वाक्षरी केली.
जिंदाल स्टेनलेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी तरुण खुल्बे म्हणाले, “भारताच्या पायाभूत सुविधांच्या भविष्यासाठी सक्षम अभियंते तयार करणे आवश्यक आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यामुळे विद्यार्थी प्रत्यक्ष कामाशी जोडले जातात तसेच त्यांना संबंधित उद्योगाचे अद्ययावत शिक्षण मिळू शकते. MIT-WPUसोबतची ही भागीदारी त्याच दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. व्यावहारिक आणि उपयोगाधारित शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी सक्षम मनुष्यबळ तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
जिंदाल स्टेनलेसचे ओडिशा येथील जाजपूर युनिट प्रमुख दीपक अग्रवाल म्हणाले, “भारतामध्ये भूमिगत पायाभूत सुविधा आणि बोगदा प्रकल्पांचा विस्तार होत आहे. त्यामुळे भविष्यातील अभियंत्यांना प्रगत आणि शाश्वत सामग्रीचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना टनेल इंजिनिअरिंगमध्ये स्टेनलेस स्टीलचा प्रत्यक्ष वापर समजून घेण्याची संधी मिळेल. उद्योगातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष अनुभवामुळे विद्यार्थ्यांना टिकाऊ आणि नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करता येतील.”
या अभ्यासक्रमासाठी जिंदाल स्टेनलेसकडून तज्ज्ञांची व्याख्याने, प्रात्यक्षिक सत्रे, अभ्यास साहित्य आणि उद्योग क्षेत्राचा प्रत्यक्ष अनुभव उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना कंपनीच्या प्रकल्पांना भेटी, इंटर्नशिप, प्रत्यक्ष प्रकल्पांवरील केस स्टडी, संशोधन प्रकल्प आणि उद्योगातील तज्ज्ञांशी संवादाची संधी मिळणार आहे.
हेही वाचा
पुण्यातील पायाभूत सुविधा विकासामुळे हिंजवडीसारख्या मायक्रो-मार्केट्सना नवी गती
अभ्यासक्रमात एकूण ४० व्याख्याने आणि आठ प्रात्यक्षिक सत्रे असतील. याशिवाय केस स्टडी, उद्योग क्षेत्रातील संवाद, क्षेत्रभेटी आणि प्रकल्पाधारित शिक्षणाचा समावेश आहे. सहा प्राध्यापक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
येत्या दशकात देशात पाच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे बोगदा प्रकल्प अपेक्षित आहेत. त्यामुळे भूमिगत पायाभूत सुविधांच्या
दीर्घकालीन टिकाऊपणासाठी स्टेनलेस स्टीलसारख्या गंजरोधक आणि टिकाऊ सामग्रीचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे.
MIT-WPUचे टनेल इंजिनिअरिंग कार्यक्रम प्रमुख डॉ. संदीप पोटणीस म्हणाले, “भारतात भूमिगत पायाभूत सुविधांचा वेगाने विस्तार होत आहे. त्यामुळे प्रगत सामग्री आणि चक्राकार वापरावर आधारित डिझाइनचे ज्ञान असलेल्या अभियंत्यांची गरज वाढत आहे. जिंदाल स्टेनलेससोबतची ही भागीदारी विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानासोबत उद्योगातील प्रत्यक्ष अनुभव देईल. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रात्यक्षिक शिक्षण आणि संशोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोगदा आणि भूमिगत बांधकाम प्रकल्पांसाठी तयार करता येईल.”
दरम्यान, MIT-WPUमधील डॉ. संदीप पोटणीस यांच्या नेतृत्वाखाली चार प्राध्यापकांच्या पथकाने नुकतीच जिंदाल स्टेनलेसच्या जाजपूर येथील प्रकल्पाला भेट दिली. या भेटीत प्राध्यापकांनी स्टेनलेस स्टीलचे उत्पादन, धातुविज्ञान, मिश्रधातू निर्मिती, ऑटोमेशन, गुणवत्ता नियंत्रण आणि गंजरोधक वापरांची माहिती घेतली. या अनुभवाचा उपयोग विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योगातील उदाहरणे समजावून सांगण्यासाठी केला जाणार आहे.
जिंदाल स्टेनलेस आणि MIT-WPU यांच्यातील या सहकार्यामुळे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दुवा अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच देशातील वाढत्या भूमिगत पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्ये असलेले अभियंते तयार करण्यास या उपक्रमाचा उपयोग होणार आहे.
जिंदाल स्टेनलेसबाबत
भारतामधील आघाडीची स्टेनलेस स्टील उत्पादक कंपनी असलेल्या जिंदाल स्टेनलेसची आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वार्षिक उलाढाल ४२,९५५ कोटी रुपये (४.८६ अब्ज अमेरिकी डॉलर) होती. कंपनीची वार्षिक वितळवणूक क्षमता ४.२ दशलक्ष टन आहे. मार्च २०२६ पर्यंत भारतासह स्पेन आणि इंडोनेशियामध्ये कंपनीचे १६ स्टेनलेस स्टील उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प असून, १२ देशांमध्ये तिचे जागतिक नेटवर्क आहे. भारतात मार्च २०२६ पर्यंत कंपनीची दहा विक्री कार्यालये आणि सहा सेवा केंद्रे आहेत. कंपनीच्या उत्पादन श्रेणीत स्टेनलेस स्टील स्लॅब, ब्लूम्स, कॉइल्स, प्लेट्स, शीट्स, प्रिसिजन स्ट्रिप्स, वायर रॉड्स, रिबार्स, ब्लेड स्टील आणि कॉइन ब्लँक्स यांचा समावेश आहे.
जिंदाल स्टेनलेस आपल्या एकात्मिक उत्पादन व्यवस्थेच्या माध्यमातून खर्चातील स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमतेत वाढ करण्यावर भर देते. १९७० मध्ये स्थापन झालेली ही कंपनी नावीन्यपूर्णतेला आणि जीवनमान समृद्ध करण्याच्या दृष्टिकोनाला प्राधान्य देत असून सामाजिक जबाबदारीसाठीही कटिबद्ध आहे.
हरित आणि शाश्वत भविष्यासाठी जिंदाल स्टेनलेस सातत्याने प्रयत्नशील आहे. कंपनी इलेक्ट्रिक आर्क फर्नेसच्या माध्यमातून स्टेनलेस स्टीलचे उत्पादन करते. या प्रक्रियेमुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात कमी होते तसेच गुणवत्तेशी तडजोड न करता स्टेनलेस स्टीलच्या भंगाराचा पुनर्वापर करणे शक्य होते.





