वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत महापौर रवी लांडगे यांचा समाजोपयोगी उपक्रमांचा संकल्प
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील दिवंगत सहकाऱ्यांना श्रद्धांजली

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्दैवी अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांनी यंदाचा आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. येत्या १५ ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस असून, वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च, जाहिरातबाजी, पोस्टर्स किंवा बॅनरबाजी न करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
वाढदिवसाचा उत्सव करण्याऐवजी रक्तदान शिबिर, महाआरोग्य शिबिर, दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्याचे वाटप तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून समाजातील गरजू नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
हेही वाचा
जिंदाल स्टेनलेस आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार
मोशी दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नऊ सहकाऱ्यांच्या दुःखद निधनामुळे यंदाचा वाढदिवस उत्साहात साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याचे महापौर रवी लांडगे यांनी स्पष्ट केले. दिवंगत सहकाऱ्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी अनावश्यक खर्च टाळून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून तोच निधी समाजोपयोगी आणि लोकहिताच्या उपक्रमांसाठी वापरण्याचा संकल्प महापौर रवी लांडगे यांनी केला आहे.
“वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी होणारी जाहिरातबाजी, पोस्टर्स आणि बॅनरबाजी टाळून त्याऐवजी समाजासाठी विधायक आणि उपयोगी कार्य करण्याचा आमचा संकल्प आहे, सर्व नागरिक, कार्यकर्ते, हितचिंतक आणि स्नेही यांनी या सेवाकार्यात सहभागी व्हावे, वाढदिवसानिमित्त होणारा अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणणे, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची खरी भेट असेल”
– रवी लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका





