TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमधील खड्डे दोन दिवसांत बुजवा!

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे अधिकाऱ्यांना आदेश; रस्त्यांसह रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या दुरुस्तीला गती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवरील खड्डे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित सार्वजनिक सुविधांच्या दुरुस्तीला महापालिका प्रशासनाने वेग दिला आहे. शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या दोन दिवसांत बुजविण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करा, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास आणि अपघातांचा धोका लक्षात घेता सर्व विभागीय कार्यकारी अभियंते, उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांनी आपल्या कार्यक्षेत्राची नियमित पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या तक्रारींची प्रतीक्षा न करता प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

खड्डे बुजविताना गुणवत्तेवर भर

खड्डे बुजविण्याची कामे केवळ तात्पुरती न करता दर्जेदार, टिकाऊ आणि सुरक्षित पद्धतीने करण्यात यावीत, यावर प्रशासनाने विशेष भर दिला आहे. दुरुस्तीच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जीपणा किंवा निकृष्ट दर्जाचे काम होऊ नये, याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे.

रेलिंग, दुभाजक आणि पदपथांचीही दुरुस्ती

रस्त्यांसोबतच शहरातील रेलिंग, दुभाजकांवरील बॅरिकेड्स, पदपथ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित इतर सार्वजनिक सुविधांची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय आवश्यक कामांची यादी तयार करून त्यांना प्राधान्यक्रम द्यावा आणि दुरुस्तीची कामे प्रभावीपणे पूर्ण करावीत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित

प्रत्येक विभागीय कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील रस्ते व सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील कामांचे नियोजन, अंमलबजावणी आणि गुणवत्तेची तपासणी यावर विशेष लक्ष द्यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा झाल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय दररोज आढावा

दुरुस्तीच्या कामांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त, मुख्य अभियंता आणि सह शहर अभियंता यांनी संबंधित कामांचा नियमित आढावा घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

खड्डे दुरुस्ती, रेलिंग, दुभाजक आणि पदपथांच्या कामांची क्षेत्रीय कार्यालयनिहाय दररोज प्रगती तपासून त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य

शहरातील रस्ते आणि सार्वजनिक सुविधा नागरिकांसाठी सुरक्षित व सुस्थितीत ठेवणे हे महापालिका प्रशासनाचे प्रमुख प्राधान्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने काम करून दुरुस्तीची कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

“नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित कामांमध्ये दिरंगाई किंवा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. प्रत्येक क्षेत्रातील कामांचा दररोज आढावा घेऊन नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.”

डॉ. विजय सूर्यवंशी, महापालिका आयुक्त

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button