जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला; बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांची गोळ्या झाडून हत्या

Jammu Kashmir | जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचे मृतदेह गोळ्यांनी चाळण केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी दबा धरून या दोन्ही अधिकाऱ्यांवर बेछूट गोळीबार करून त्यांची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. रशपाल कुमार (वय ४०) आणि बाबी चंद (वय ५४) अशी या शहीद झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.
रशपाल कुमार आणि बाबी चंद हे दोन्ही अधिकारी बेपत्ता झाल्याने सुरक्षा दलांच्या शोध पथकाकडून त्यांचा कसून शोध घेतला जात होता. शोधमोहिमेदरम्यान किश्तवाडच्या परिसरात या दोघांचे मृतदेह अत्यंत छिन्नविछिन्न आणि गोळ्यांनी चाळण झालेल्या अवस्थेत सापडले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा
वाकडच्या ‘दिवाळी संध्ये’त राहुल देशपांडे यांच्या सुरांनी रसिक मंत्रमुग्ध
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेतून दहशतवाद्यांचे क्रौर्य पुन्हा एकदा उघड झाले असून, या दोन्ही अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने अतिरेकी आधीच दबा धरून बसले होते; त्यांनी एका अधिकाऱ्याच्या डोक्यात तर दुसऱ्याच्या पाठीत गोळी मारून आणि दोघांच्याही शरीरावर अनेक गोळ्या झाडून मृतदेहांची चाळण करत त्यांची निर्घृण हत्या केली, तसेच हल्ल्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांकडील सरकारी रायफल्स गायब असल्याने दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केल्यानंतर ही शस्त्रे हिसकावून नेल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे, तर या घटनेनंतर संपूर्ण किश्तवाड परिसरात सुरक्षा यंत्रणांनी नाकाबंदी करून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.




