To The Point : राष्ट्रवादीला भाजपाची धास्ती? : ‘एसआयआर’ साठी आता धावाधाव..!
‘‘भाजपा पॅटर्न’’ची चर्चा : संघटन, ‘एसआयआर’ आणि निवडणूक तयारीसाठी राष्ट्रवादीची वाढती अस्वस्थता

पिंपरी- चिंचवड | विशेष प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे संघटनात्मक कामगिरी सुमार आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीने ‘एसआयआर’ म्हणजे मतदार पडताळणी मोहीमेत घेतलेली आघाडी आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची वाढलेली धास्ती स्पष्टपणे दिसू लागली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये ‘एसआयआर’मधील कामगिरी निर्णायक ठरणार आहे. मात्र, संघटनात्मक कामगिरी अभावी राष्ट्रवादीची धावाधाव सुरू असून, यामुळे ‘‘भाजपा पॅटर्न’’ राबवण्यात येत असल्याचे वृत्त आहे.
भाजपाने मतदार पडताळणी (SIR), बूथनिहाय संघटनबांधणी आणि प्रभागनिहाय निवडणूक तयारीला वेग दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठकांवर जोर दिला आहे. सोबतच एसआयआर साठी कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे “राष्ट्रवादीला भाजपाची धास्ती लागली आहे का?” असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
वास्तविक, भाजपाने बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्नाप्रमुख आणि एसआयआर मोहिमेद्वारे मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू आहे. त्याला यश मिळताना दिसते. गेल्या काही महिन्यांत भाजपाने शहरात संघटन विस्तारावर विशेष भर दिला आहे. प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची फळी उभी करणे, नवीन मतदारांपर्यंत पोहोचणे आणि निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करणे या रणनीतीवर पक्ष काम करत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून २०१७ पर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये निर्विवाद सत्ता असलेल्या राष्ट्रवादीला आता विरोधी बाकावर बसावे लागले आहे. शहरातील तीनपैकी दोन विधानसभा, दोन पैकी एक लोकसभा आणि १२८ पैकी ८५ नगरसेवकपदाच्या जागांवर पराभव पत्करावा लागला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक पातळीवरील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे राष्ट्रवादीसमोर पूर्वीची ताकद कायम ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक नेत्यांची पक्षांतरं, बदलते सामाजिक समीकरण आणि भाजपाचे वाढते संघटन यामुळे राष्ट्रवादी अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
भाजपाच्या कार्यपद्धतीची कॉपी?
विशेष म्हणजे, आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूकपूर्व संघटनात्मक मोहिमांवर फारसा भर दिला जात नव्हता. मात्र, भाजपाने एसआयआर मोहिमेला प्राधान्य दिल्यानंतर राष्ट्रवादीनेही कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या, प्रभागनिहाय बैठका आणि मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे भाजपाने आखलेल्या रणनीतीचाच अवलंब राष्ट्रवादी करीत आहे. पण, त्याला पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही. किंबहुना, स्थानिक पातळीवर पक्षाची धुरा सांभाळणारे शहराध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते योगेश बहल संघटनात्मक कामगिरी उंचावण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण, अपेक्षीत यश मिळताना दिसत नाही.
संघटन विरुद्ध सत्तेचा आधार
राजकीय निरीक्षकांच्या मते, केवळ सत्तेत सहभाग असल्याने निवडणूक जिंकता येत नाही. त्यासाठी बूथस्तरावरील सक्षम संघटन, प्रशिक्षित कार्यकर्ते आणि मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क आवश्यक असतो. याच बाबतीत भाजपा आघाडीवर असल्याचे दिसत असून, राष्ट्रवादी आता ही उणीव भरून काढण्याच्या प्रयत्नात आहे. पण, एसआयआर मोहीम अंतिम टप्प्यात पोहोचत असताना राष्ट्रवादीने संघटनात्मक हालचालींना गती दिली आहे. त्यामुळे ही तयारी उशिरा सुरू आहे. घाईघाईने सुरू केलेल्या मोहिमेचा किती फायदा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रत्येक मतदारावर भाजपाचे लक्ष
भाजपाने मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, नवीन मतदारांची नोंदणी, स्थलांतरित मतदारांची पडताळणी आणि बूथनिहाय माहिती संकलनावर भर दिला आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची पक्षाची रणनीती स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, भाजपाचे नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा ‘‘बालेकिल्ला’’ म्हणून ओळखला जाणारा भोसरी विधानसभा मतदार संघात सर्वाधिक ‘एसआयआर’ मोहीम राबवण्यात आली आहे. त्यामुळे भाजपाचे प्रत्येक मतदारावर लक्ष आहे, तर राष्ट्रवादीचे भाजपाच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष आहे, असे चित्र आहे.





