गोळ्या झाडूनही स्कॉर्पिओ थांबली नाही…; जम्मू-श्रीनगर हायवेवर सुरक्षा यंत्रणांची धावपळ; हाय अलर्ट जारी

Jammu Kashmir Highway High Alert : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील चंदेरकोट येथील सुरक्षा तपासणी नाक्यावर भरधाव स्कॉर्पिओ गाडीने बॅरिकेट्स तोडून पळ काढल्याने सुरक्षा दलांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. गाडी थांबवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला, परंतु चालक गाडीसह पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर ही गाडी एका निर्जन ठिकाणी सापडली असून संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ३:३० च्या सुमारास ही घटना घडली. एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ श्रीनगरकडून जम्मूच्या दिशेने जात होती. जेव्हा ती रामबनमधील चंदरकोट भागातील सुरक्षा चौकीजवळ पोहोचली, तेव्हा तिथे तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तिला थांबण्यासाठी इशारा दिला. मात्र, चालकाने बॅरिकेट्स तोडले आणि नाशरीच्या दिशेने गाडी पळवली.
हेही वाचा – शेतकरी कर्जमाफीची नवीन तारीख समोर! आता या दिवशी खात्यात जमा होणार पैसा
स्कॉर्पिओचा हा संशयित प्रकार पाहून नाक्यावर तैनात पोलिसांनी गाडीचा पाठलाग केला. गाडीचे टायर पंक्चर करण्याच्या उद्देशाने ३ राउंड फायर केले. परंतु, गोळीबारानंतरही चालकाने गाडी न थांबवता पळ काढला. पोलिस पाठलाग करत असल्याने चालकाने दलवासजवळ रस्त्याच्या कडेला गाडी सोडून दिली आणि अंधाराचा फायदा घेत जंगलाच्या दिशेने पळून गेला. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. रामबनचे पोलीस अधीक्षक अरुण गुप्ता यांनी सांगितले की, “संशयित स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू आहे.”
या घटनेनंतर रामबन जिल्हा पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस बल आणि भारतीय लष्कराने संयुक्तपणे संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. चंद्रकोट ते नाशरी आणि दलवास परिसरातील जंगले आणि महामार्गाला लागून असलेल्या भागात तपासणी केली जात आहे. संशयित चालकाचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वानपथकाची मदत घेतली जात आहे. तसेच महामार्गावरील प्रत्येक वाहनाची कडक तपासणी सुरू आहे.





