ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरात २१ ते २३ ऑगस्टदरम्यान ‘जिगीषा नाट्यसहवास’; रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते उद्घाटन

तीन दिवस रंगणार नाटक, साहित्य आणि अभिवाचनाचा सांस्कृतिक मेळा; ‘मिलिंद सफई पुरस्कार’चाही होणार प्रारंभ

छत्रपती संभाजीनगर | मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन (एमजीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘जिगीषा नाट्यसहवास’ या त्रिदिवसीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन २१ ते २३ ऑगस्ट दरम्यान करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे सलग चौथे वर्ष असून, ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांच्या हस्ते २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात उद्घाटन होणार आहे.

उद्घाटन समारंभाला एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम तसेच फाउंडेशनचे विश्वस्त नंदकिशोर कागलीवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. उद्घाटनानंतर सायंकाळी ७.३० वाजता ‘हॅनाची सुटकेस’ या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे. मूळ लेखिका कॅरन लिवाईन यांच्या साहित्यावर आधारित या नाटकाचा मराठी अनुवाद माधवी पुरंदरे यांनी केला असून दिग्दर्शन जयेश आपटे यांचे आहे. या नाटकात साजिरी जोशी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

यंदाच्या महोत्सवात प्रथमच ‘मिलिंद सफई पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. नोकरी किंवा उपजीविकेसोबत रंगभूमीवर सातत्याने कार्य करणाऱ्या रंगकर्मीचा या पुरस्कारासाठी सन्मान केला जातो. यावर्षीचा पुरस्कार अभिनेते व लेखक योगेश शिरसाठ यांना उद्घाटन समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.

उद्घाटनापूर्वी सायंकाळी ५ वाजता ज्येष्ठ लेखक व प्रकाशक बाबा भांड यांच्या हस्ते नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या प्रदर्शनात नाट्यसंहिता, नाट्यसमीक्षा, नाट्यविषयक अभ्यासपूर्ण साहित्य तसेच कलावंतांची आत्मचरित्रे उपलब्ध असणार आहेत.

दुसऱ्या दिवशी मुलाखत, परिसंवाद आणि नाट्यप्रयोग

२२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आईन्स्टाईन सभागृहात रत्ना पाठक शाह यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर त्यांच्याशी संवाद साधतील.

हेही वाचा

नाशिक TCS धर्मांतर प्रकरण: आरोपी निदा खानला आश्रय देणारा नगरसेवक अटकेत

दुपारी ४ वाजता ‘साहित्य ते नाटक : माध्यम रूपांतर’ या विषयावरील परिसंवाद होणार असून, त्यामध्ये नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, साहित्यिक बालाजी सुतार आणि आसाराम लोमटे सहभागी होणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता अपूर्वा कुलकर्णी आणि गिरीश दातार यांचे ‘सवाल-जवाब’ हे नाटक सादर होईल. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर भाष्य करणारे हे नाटक महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

समारोपाला ‘बरड’चा प्रयोग

महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रख्यात नाटककार अजित दळवी यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. मुस्तजीब खान आणि शिव कदम त्यांच्याशी संवाद साधतील.

दुपारी ४ वाजता ‘उमगलेले गांधी’ या अभिवाचन कार्यक्रमात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, दीपक राजाध्यक्ष, चंद्रकांत कुलकर्णी आदी गांधी विचारांवरील निवडक साहित्याचे अभिवाचन करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता सुनील डोंगर लिखित व दिग्दर्शित ‘बरड’ या नाटकाच्या प्रयोगाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

आयोजकांच्या मते, अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाप्रमाणेच *‘जिगीषा नाट्यसहवास’*मुळेही छत्रपती संभाजीनगरच्या सांस्कृतिक चळवळीला नवी ऊर्जा मिळत असून, या त्रिदिवसीय महोत्सवाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, नीलेश राऊत, दासू वैद्य, श्रीपाद पद्माकर, अभय जोशी, डॉ. रेखा शेळके, डॉ. प्रेरणा दळवी, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. अजय दंडे, डॉ. शिव कदम, सुबोध जाधव आणि श्रीकांत येरुळे यांनी केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button