ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या प्रश्नांवर महापौर रवि लांडगे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा

शहराच्या पाणीपुरवठ्याला बाधा न आणता प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर व गावाच्या विकासकामांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याचे आश्वासन

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्पाच्या अनुषंगाने शिवे–वाकी तर्फे वाडा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने आज महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन गावातील प्रलंबित विकासकामे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.

यावेळी ग्रामस्थांनी भामा-आसखेड प्रकल्पासाठी दिलेल्या सहकार्याच्या पार्श्वभूमीवर गावातील पाणीपुरवठा व जलवाहिनीची प्रलंबित कामे, अंतर्गत रस्ते, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वीजपुरवठा, सांडपाणी व गटार व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, स्मशानभूमी व परिसराचे सुशोभीकरण, मंदिर परिसरातील आवश्यक सुविधा, सभागृह, खेळाचे मैदान, वृक्षारोपण तसेच इतर मूलभूत विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच भामा-आसखेड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर महापालिका प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

ग्रामस्थांनी विविध मागण्या मांडल्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत संबंधित विषयांवर सविस्तर चर्चा केली. प्रत्येक मागणीची वस्तुनिष्ठ माहिती घेऊन संबंधित विभागांमार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्या आणि गावाच्या विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेऊन टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्याबाबत यावेळी चर्चा झाली.

हेही वाचा

मोशी कचरा डेपो दुर्घटना : ७ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा

महापौर रवि लांडगे म्हणाले, “भामा-आसखेड प्रकल्प हा पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. शहराच्या पाणीपुरवठ्याला कोणत्याही परिस्थितीत बाधा येऊ न देता हा प्रकल्प नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. त्याचवेळी या प्रकल्पासाठी मोलाचे योगदान दिलेल्या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या न्याय्य मागण्या, प्रलंबित प्रश्न आणि गावाच्या विकासकामांकडेही संवेदनशीलतेने पाहून त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. शहराचा विकास आणि प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे हित या दोन्ही बाबींचा समतोल राखत प्रशासनामार्फत सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल.”

यावेळी ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध विषयांबाबत संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यावर भर देण्यात आला. गावातील प्रलंबित विकासकामे तसेच प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे प्राधान्याने आणि टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच शिवे–वाकी तर्फे वाडा येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button