ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोशीवरील कचऱ्याचा ताण आता कमी करा; शहरात किमान १० पर्यायी कचरा प्रक्रिया केंद्रे उभारावीत

नगरसेवक तथा ‘क’ प्रभाग सभापती निखिल बोऱ्हाडे यांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मागणी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहराच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोशी परिसरावर गेल्या अनेक वर्षांपासून पडणारा कचऱ्याचा एकतर्फी ताण कमी करून शहरातील विविध भागांमध्ये विकेंद्रित पद्धतीने कचरा प्रक्रिया केंद्रे उभारावीत, अशी मागणी प्रभाग क्रमांक २ मोशी येथील नगरसेवक तथा ‘क’ प्रभाग सभापती निखिल बोऱ्हाडे यांनी केली आहे.

याबाबत बोऱ्हाडे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पत्र देऊन कचरा व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन आणि शाश्वत नियोजन करण्याची मागणी केली आहे.

मोशी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. शहराच्या विकासासाठी मोशीकरांनी आजवर सातत्याने सहकार्य केले आहे. मात्र, वर्षानुवर्षे शहरातील मोठ्या प्रमाणावरील कचरा मोशी परिसरात आणून टाकला जात असल्याने येथील नागरिकांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत, असे बोऱ्हाडे यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

मोशी परिसरात मोठ्या प्रमाणावर साचणाऱ्या कचऱ्यामुळे दुर्गंधी, वायू प्रदूषण, भूजल व पाण्याचे प्रदूषण, तसेच कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या लिचेटमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. या सर्वांचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होत असून भविष्यात त्याचे अधिक गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी भूमिका निखिल बोऱ्हाडे यांनी मांडली आहे.

हेही वाचा –  पांढरा भात खाल्ल्यानं वजन वाढतं असं नाही, तज्ज्ञांकडून जाणून घ्या लठ्ठपणाचं मुख्य कारण काय?

दररोज १,५०० टन कचरा; प्रक्रिया क्षमतेपेक्षा ८०० टन अधिक

मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पाची प्रक्रिया क्षमता सुमारे ७०० टन प्रतिदिन आहे. दुसरीकडे शहरातून दररोज सुमारे १,५०० टन कचरा निर्माण होत असल्याने प्रक्रिया क्षमतेपेक्षा सुमारे ८०० टन अतिरिक्त कचऱ्याचे डम्पिंग करण्याची वेळ येत आहे. भविष्यात पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत असताना कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात दररोज २,००० ते २,५०० टन कचरा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, आत्तापासूनच दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे असल्याचे निखिल बोऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.

शहरात किमान १० ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रे उभारण्याची मागणी

कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न केवळ मोशीपुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरासाठी विकेंद्रित स्वरूपाचे नियोजन करण्यात यावे, अशी ठोस मागणी निखिल बोऱ्हाडे यांनी केली आहे.
शहरातील लोकसंख्या, प्रभागनिहाय कचऱ्याचे प्रमाण आणि भविष्यातील वाढ लक्षात घेऊन किमान १० ठिकाणी पुढील १० वर्षांची गरज लक्षात घेऊन कचरा प्रक्रिया व विल्हेवाटीसाठी जागा निश्चित कराव्यात. या जागा अधिकृतपणे निश्चित करून त्याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

‘मोशीवर अतिरिक्त कचरा टाकू देणार नाही’

दरम्यान, पर्यायी कचरा प्रक्रिया केंद्रांबाबत तातडीने निर्णय घेऊन कार्यवाही न झाल्यास मोशी परिसरात दररोज होणारे ७०० टनांपेक्षा अधिक कचऱ्याचे डम्पिंग तसेच भविष्यात वाढणारा अतिरिक्त कचरा मोशी येथे टाकू देणार नाही, असा स्पष्ट इशारा नगरसेवक निखिल बोऱ्हाडे यांनी दिला आहे. या मागणीबाबत उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस महानगरपालिका प्रशासन जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button