अतीक अहमदच्या मुलाचा भीषण अपघातात मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

Atiq Ahmed Son Aban Ahmed | कुख्यात गँगस्टर अतीक अहमद याचा सर्वात लहान मुलगा अबान अहमद याचा झाशीमध्ये झालेल्या भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. झाशीच्या जिल्हा कारागृहात बंद असलेल्या आपल्या भावाला भेटण्यासाठी प्रयागराजहून कारने जात असताना, कार थेट दुभाजकाला (Divider) जाऊन धडकल्याने हा अपघात घडला. या भीषण दुर्घटनेत अबानसह त्याच्या एका मित्राचा जागीच मृत्यू झाला असून, इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
झाशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबान अहमद हा त्याच्या चार मित्रांसोबत प्रयागराज येथून झाशी जिल्हा कारागृहात बंद असलेला त्याचा भाऊ अली अहमद याला भेटण्यासाठी कारने निघाला होता. १ ऑक्टोबर २०२५ रोजी अली अहमदला नैनी मध्यवर्ती कारागृहातून झाशी कारागृहात हलवण्यात आले होते. महामार्गावरून प्रवास करत असताना भरधाव कार दुभाजकाला धडकल्याने कारचा पुढील भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आणि कारचे भाग रस्त्यावर विखुरले. अपघाताचे स्वरूप अत्यंत भीषण होते.
हेही वाचा
सुनेत्राताई पवार यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध
अली अहमद खंडणीप्रकरणी झाशी तुरुंगात
अतीक अहमदच्या हत्येनंतर त्याचा मुलगा अली अहमद याने त्यांच्या गुन्हेगारी नेटवर्कची सूत्रे हाती घेतली होती. खंडणी वसुली आणि बहुचर्चित उमेश पाल हत्याकांडात संशयित आरोपी असल्याने अली सध्या झाशीच्या तुरुंगात आहे. २००५ मधील बसपा आमदार राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार असलेल्या उमेश पाल यांची प्रयागराजमध्ये हत्या करण्यात आली होती, ज्याची सूत्रे तुरुंगातूनच हलवण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
अतीक अहमदची हत्या
एप्रिल २०२३ मध्ये शंभराहून अधिक गुन्हे दाखल असलेला कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांची प्रयागराज येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना पत्रकार बनून आलेल्या तीन तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. अतीकच्या पाच मुलांपैकी अली अहमद तुरुंगात शिक्षा भोगत असतानाच, आता त्याला भेटण्यासाठी निघालेला त्याचा सर्वात लहान मुलगा अबान अहमद याचा झाशीतील भीषण अपघातात दुर्दैवी अंत झाला आहे.





