“आता निवृत्ती कधी घ्यायची हे रोहितच ठरवणार”, हिटमॅनच्या भविष्यावर मोहम्मद कैफचं मोठं वक्तव्य, म्हणाला….

Rohit Sharma: भारतीय संघ २०२७ मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठीची संघबांधणी सुरु झाली आहे. शुबमन गिल या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसेल. पण संघातील सर्वात अनुभवी फलंदाज, रोहित शर्मा ही स्पर्धा खेळणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. रोहित १९ जुलैला लॉर्ड्सच्या मैदानावर शेवटचा वनडे सामना खेळणार, अशी चर्चा रंगली होती. पण बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं. पण रोहित शर्मा आगामी वनडे वर्ल्डकप खेळणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. याबाबत बोलताना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने मोठं वक्तव्य केलं आहे.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्माला भारतीय वनडे संघात स्थान देण्यात आलं होतं. या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्माचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. त्यानंतर मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्याआधी अशी चर्चा रंगली होती की, लॉर्ड्सच्या मैदानावर होणारा तिसरा वनडे सामना हा रोहितच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. पण तिसऱ्या सामन्याआधीच बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं होतं, की हा रोहितच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना नसेल. रोहितने या सामन्यात फलंदाजी करताना १३८ धावांची वादळी शतकी खेळी केली होती.
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना मोहम्मद कैफ म्हणाला, “एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे. कोचिंग स्टाफमधील सदस्य अनेकदा पत्रकार परिषदेत येतात आणि म्हणतात की, आम्ही रोहितला त्याचा नॅच्यूरल गेम खेळण्याचं पूर्ण स्वतंत्र्य दिलं आहे. पण अजूनतरी कोणीच असं म्हटलेलं नाही की, रोहित शर्मा वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी आमच्या संघाचा भाग असणार आहे. कोणीतरी असंही म्हणायला हवं.”
हेही वाचा – मक्याचे केस निरुपयोगी समजून फेकताय? जाणून घ्या त्याचे शरीरास होणारे फायदे, चहा करुन प्या…
तसेच तो पुढे म्हणाला की, “रोहितच्या फॉर्ममध्ये चढ-उतार होत राहणार. एखाद्या मालिकेत तो फ्लॉप ठरु शकतो. पण टीम मॅनेजमेंटने त्याला सांगायला हवं की, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. त्याला स्वतंत्र्य देण्यासह तुम्ही सांगायला हवं की, आम्ही तुला सपोर्ट करतोय. आतापर्यंत तरी कोणीच असं म्हणालेलं नाही. यावरुन शंका येते. आपण बाहेर आहोत, त्यामुळे आतमध्ये काय होतंय हे आपल्याला कळू शकत नाही. मला तरी हेच वाटतंय की, रोहितने आता ठरवलंय की, त्याला कोणीच संघाबाहेर करु शकत नाही. आता निवृत्ती केव्हा घ्यायची हे रोहित स्वत: ठरवणार.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “लॉर्ड्सच्या मैदानावरील वनडे सामना हा त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल, अशी चर्चा रंगली होती. पण बीसीसीआय सचिवांनी केलेलं ते वक्तव्य फायदेशीर ठरलं. हा टर्निंग पॉईंट ठरला आणि याच सामन्यात रोहितने शतक झळकावलं.”





