पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान’चा शुभारंभ; निगडीच्या अमृता विद्यालयम् व जुनिअर कॉलेजचा उत्स्फूर्त सहभाग

चिंचवड (प्रतिनिधी):
भारत सरकार आणि माता अमृतानंदमयी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील अमृता विद्यालयम् आणि जुनिअर कॉलेजमध्ये ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ (Nasha Mukt Yuva for Viksit Bharat) या महत्त्वपूर्ण अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी आणि समाजात त्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात अम्मांचे शिष्य ब्रह्मचारी राजेश कुमार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थी व मान्यवरांनी प्रार्थना केली आणि काही वेळ ध्यान करत कार्यक्रमाची सकारात्मक सुरुवात झाली.
कार्यक्रमाचा अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी आणि सद्गुरु माता अमृतानंदमयी देवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेला राष्ट्रीय ऑनलाईन लॉन्च कार्यक्रम ठरला, ज्यामध्ये अमृता विद्यालयम् आणि जु. कॉलेज, निगडी, पुण्याच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला. या ऑनलाईन राष्ट्रीय महाअभियानाच्या उद्घाटनादरम्यान पंतप्रधानांनी विकसित भारताच्या निर्मितीमध्ये युवकांची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करत, निरोगी आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच माता अमृतानंदमयी देवी यांच्या ऑनलाईन संदेशाद्वारे युवकांनी आध्यात्मिक बळावर आणि सकारात्मक विचारांनी व्यसनांपासून दूर राहून आपले जीवन उज्ज्वल करावे असा मोलाचा संदेश लाभला.
हेही वाचा – व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये आंतरशालेय संस्कृत नाट्य स्पर्धा उत्साहात संपन्न

कार्यक्रमात शाळेतील तब्बल १२०० विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या सर्वांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन माध्यमातून नशा मुक्त राहण्याची तसेच समाजात या बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रतिज्ञा घेतली. शाळेच्या शिक्षिका सौ. जया अरविंद यांनी उपस्थितांना ऑफलाईन प्रतिज्ञा दिली. शाळेचा माजी विद्यार्थी श्री. प्रतीक राटडीया याने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याने विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा, सध्याच्या अभ्यासाचा भविष्यातील करिअरवर कसा प्रभाव पडतो आणि नशेमुळे आरोग्यावर व भविष्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका ब्रह्मचारिणी पावनामृता चैतन्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शिजा नायर, आभार प्रदर्शन: सौ. वृंदा महाजन यांनी केले.
या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये ९ ऑगस्टपर्यंत विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील कार्यक्रमांचा समावेश आहे: रॅली (प्रभात फेरी), सह्यांचा उपक्रम (स्वाक्षरी मोहीम), पोस्टर मेकिंग स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रश्नमंजुषा (प्रश्नोत्तरे) स्पर्धा, निबंध स्पर्धा.





