पवना धरण ९९ टक्के भरले; नदीपात्रात १०,००० क्युसेकने विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा!

पिंपरी-चिंचवड | घाटमाथ्यावर पवना धरण क्षेत्रात कालपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पवना धरण सध्या ९९ टक्के भरले असून धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पवना नदीपात्रातील विसर्ग वाढविण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. सध्या नदीपात्रात ५,७२० क्युसेक विसर्ग सुरू असून तो वाढवून आज (दि.०३) रोजी सकाळी दहा वाजता १०,००० क्युसेक इतका करण्यात आला आहे.
पवना धरण प्रकल्प कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. पावसाचे प्रमाण आणि येणारा पाण्याचा प्रवाह लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून १५,००० क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा
महिला कुस्तीपटू लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह यांची निर्दोष मुक्तता
सततच्या पर्जन्यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होऊ शकते. त्यामुळे पवना नदीच्या सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पवना नदी खोऱ्यातील ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प पवनानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.




