“देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न”; चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

पुणे | राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे भरभरून कौतुक केले आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वगुणसंपन्न आहेत. ते अनेक भूमिका लीलया पार पाडतात. एक तर नक्की आहे, या माणसाला काहीतरी दैवी शक्ती मिळाली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. पुण्यात रविवारी पार पडलेल्या ‘देवाभाऊ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एक तर नक्की आहे, या माणसाला (देवेंद्र फडणवीस) काहीतरी दैवी शक्ती मिळाली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. म्हणजे तो संघटकही असतो, राज्यकर्ताही असतो, मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, लिहतोही प्रचंड, तो कुटुंबवत्सलही आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील घटना लक्षात ठेवून तो अभिनंदन करतो.
हेही वाचा
पवना धरण ९९ टक्के भरले; नदीपात्रात १०,००० क्युसेकने विसर्ग सुरू, सतर्कतेचा इशारा!
देवेंद्रजी हे नाव असं आहे की त्यांच्याबाबतीत पुस्तक आहे म्हटल्यावर मी नाही म्हणू शकलो नाही. पुस्तकाच्या विविध चॅप्टर्सची माहिती मी घेतली. देवाभाऊंवर किमान २५ ते ३० पुस्तकं झाली आहेत. त्यातलं वेगळं पुस्तक हे देवाभाऊ आहे असं मला वाटतं. कारण या पुस्तकात त्यांचं बालपण, शाळा सोडली तो प्रसंग इथपासून सगळेच प्रसंग आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस हे पुण्यात राहतात हे आज अनेकांना कळलं असेल. कारण हे सगळेच जण म्हणजेच सगळेच फडणवीस कुटुंबीय लो प्रोफाइल राहतात. आपलं काम अतिशय शांतपणे करतात. बाळासाहेब फडणवीस यांनी भारतीय मजदूर संघाचं अध्यक्षपद भुषवलं आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण करणारी त्यांची संस्था आहे. तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठीही ते काम करत आहेत अशीही माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.





