बनावट NEFT स्क्रीनशॉट दाखवून सोनाराला ६.२९ लाखांचा गंडा
दिघीतील प्रकार; ९.२९ लाखांचे दागिने बनवून घेतले, आरोपी अद्याप अटकेबाहेर

दिघी | दागिने बनवून घेतल्यानंतर उर्वरित रक्कम एनईएफटीद्वारे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवत एका सोनाराची ६ लाख २९ हजार ७८० रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार दिघीतील सावंतनगर येथील कृष्णा सिल्वर वर्कशॉपमध्ये घडला.
याप्रकरणी निलेश बाळकृष्ण जाधव (वय ४६, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विवेक आनंद हातकामकर (वय ३६, रा. पोलादपूर, महाड, जि. रायगड) याच्याविरोधात दिघी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा
अभिजीत दिपकेंच्या अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च कसा झाला? आरटीआय कार्यकर्त्याची चौकशीची मागणी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून सुरुवातीला ३ लाख रुपये आगाऊ दिले. त्यानंतर फिर्यादीकडून ५९.८७० ग्रॅम वजनाचे एकूण ९ लाख २९ हजार ७८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बनवून घेतले.
दागिने घेताना उर्वरित ६ लाख २९ हजार ७८० रुपये एनईएफटीद्वारे पाठवल्याचा खोटा स्क्रीनशॉट आरोपीने फिर्यादीला दाखवला. पैसे खात्यात जमा झाल्याचा विश्वास निर्माण करून आरोपी दागिने घेऊन निघून गेला. प्रत्यक्षात पैसे जमा न झाल्याचे लक्षात आल्यानंतर फसवणूक झाल्याचे उघड झाले.
या प्रकरणी १ ऑगस्ट रोजी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.





