चाकणच्या विकासाला वेग; ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे आदेश, १०० सुरक्षा जवानांची नियुक्ती
कचरा व्यवस्थापन, पार्किंग, वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांवरही तातडीने कारवाई; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आढावा

पुणे : चाकण परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी हा रोडमॅप अधिक वेगाने राबविण्याच्या सूचना दिल्या.
चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी १०० अतिरिक्त सुरक्षा जवानांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच गरजेनुसार नवीन पोलीस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
३१ ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे आदेश
चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ३१ ऑगस्टपर्यंत खड्डे आणि साईडपट्ट्यांची दुरुस्ती पूर्ण करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. कामात दिरंगाई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.
वाहतूक कोंडीची ठिकाणे, रस्त्यांची दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थापन यावरही प्राधान्याने कार्यवाही केली जाणार आहे. गर्दीच्या वेळेत जड वाहनांवर निर्बंध आणण्यासोबतच औद्योगिक कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
पार्किंगचा प्रश्नही मार्गी लावणार
एमआयडीसी परिसरातील उपलब्ध पार्किंगच्या जागा एका आठवड्यात सुरू करून रस्त्यावर उभे राहणारे ट्रक त्या ठिकाणी हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. रस्ते, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन या तिन्ही बाबींचा एकत्रित विचार करून वाहतूक कोंडी कमी करण्यावर भर दिला जाणार आहे.
हेही वाचा – Rules Changes : १ सप्टेंबरपासून बदलणार अनेक महत्त्वाचे नियम; LPGपासून FD, ATM शुल्कापर्यंत काय होणार बदल?
कचरा व्यवस्थापनासाठी प्रक्रिया प्रकल्प
चाकण परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडविण्यासाठी एमआयडीसीशी चर्चा करण्यात आली आहे. १९ गावे आणि एमआयडीसी क्षेत्रासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. प्लास्टिक कचऱ्यावरही तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चाकणमध्ये प्रवेश करताना रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा आणि प्लास्टिक दिसणे ही चिंतेची बाब असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या या परिसराची स्वच्छता आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अतिक्रमणांवर कठोर कारवाई
चाकण परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्नही प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. अतिक्रमण काढताना कोणाचीही गय केली जाणार नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले. येत्या शुक्रवारपासून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करून ती महिनाभरात पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी डुडी यांनी दिली.
सर्व यंत्रणांचा समन्वय महत्त्वाचा
चाकणच्या विकासासाठी एमआयडीसी, पीएमआरडीए आणि इतर संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, पार्किंग, सुरक्षा, अतिक्रमण, गृहनिर्माण सोसायट्या आणि शाळांशी संबंधित प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही केली जाणार आहे.
दर शुक्रवारी संबंधित विभागांची बैठक घेऊन उपाययोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. वाहनचालकांसोबतच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वॉकवे आणि सुरक्षित रस्त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे.
उद्योजक, वाहतूक क्षेत्रातील प्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीही बैठकीत विविध समस्या मांडल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.





