To The Point : मतभिन्नता म्हणजे गटबाजी नव्हे; भाजपामध्ये ‘कोअर कमिटी’च निर्णायक!
समाजमाध्यमांमधील आरोप राजकीय; सामूहिक निर्णय प्रक्रियेलाच ‘गटबाजी’चे लेबल?

पिंपरी- चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी असल्याचा आरोप समाजमाध्यमांमधून सातत्याने केला जात आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील काही उपसूचना, प्रशासकीय निर्णय आणि पदाधिकाऱ्यांमधील चर्चांचा आधार घेत भाजपमध्ये अनेक सत्ताकेंद्रे निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. याबाबत आम्ही शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची भूमिका जाणून घेतली.
गटबाजी, मतभेद आणि अंतर्गत कलह… अशा या सर्व आरोपांचे खंडन करत भाजपाने स्पष्ट केले आहे की, मतभिन्नता म्हणजे गटबाजी नव्हे आणि पक्षातील प्रत्येक महत्त्वाचा निर्णय हा कोअर कमिटीच्या सामूहिक चर्चेनंतरच घेतला जातो.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, पक्षामध्ये कोणतीही गटबाजी नाही. महापालिकेतील प्रशासन, विकासकामे, धोरणात्मक निर्णय किंवा राजकीय भूमिका याबाबत महापौर, सभागृह नेते, आमदार, वरिष्ठ पदाधिकारी आणि संघटनात्मक नेतृत्व यांच्यामध्ये चर्चा होणे ही पक्षाची कार्यपद्धती आहे. सर्व बाजू ऐकून, कायदेशीर आणि प्रशासकीय पैलूंचा विचार करून अंतिम निर्णय कोअर कमिटीमध्ये घेतला जातो. त्यानंतर त्याची अंमलबजावणी सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांकडून एकसंघपणे केली जाते.
भाजप चा विस्तार आणि समन्वयाची गरज
महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तब्बल १२८ पैकी ८५ जागा निवडून आल्या आहेत. विविध सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक पार्श्वभूमी असलेले नगरसेवक आज पक्षात आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही महत्त्वाच्या विषयावर विस्तृत चर्चा होणे स्वाभाविक आहे. प्रत्येक विषयावर एकच मत असणे शक्य नसते. मात्र, चर्चा संपल्यानंतर पक्षाचा अधिकृत निर्णय सर्वांनी स्वीकारणे ही भाजपाची परंपरा आहे, असे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, मोठ्या पक्षांमध्ये मतांची देवाणघेवाण, विविध पर्यायांवर चर्चा आणि निर्णयापूर्वी अनेक स्तरांवर सल्लामसलत होणे ही लोकशाहीचीच प्रक्रिया असते. अशा चर्चांना गटबाजीचे स्वरूप देणे हे वस्तुस्थितीपेक्षा राजकीय अर्थ लावण्याचा प्रकार ठरू शकतो.
उपसूचना मागे घेणे म्हणजे जबाबदार निर्णय
अलीकडे काही उपसूचनांवरून भाजपावर टीका करण्यात आली. त्याद्वारे ‘नॅरेटिव्ह’ करण्याचा प्रयत्न होतो. मात्र, शहर अभियंत्यांच्या पदांबाबतची उपसूचना असो किंवा इतर काही प्रशासकीय प्रस्ताव, त्यामध्ये कायदेशीर अडचणी लक्षात आल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आला. विरोधकांनी याला “यू-टर्न” म्हटले; मात्र भाजपाच्या मते, कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेणे हीच सुशासनाची ओळख आहे.
एखादा प्रस्ताव पुढे नेल्यानंतर त्यात तांत्रिक अडचणी असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा फेरविचार करणे हे परिपक्व नेतृत्वाचे लक्षण आहे. चुकीचा निर्णय केवळ प्रतिष्ठेचा प्रश्न बनवून कायम ठेवण्यापेक्षा त्यामध्ये आवश्यक सुधारणा करणे ही अधिक जबाबदार भूमिका असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी ठामपणे सांगितले.
मतभिन्नता म्हणजे लोकशाही : भाजप
महापालिकेतील पाणीपुरवठा, विकासकामे, निधीचे नियोजन किंवा प्रशासकीय रचना अशा अनेक विषयांवर वेगवेगळी मते समोर येतात. विविध पदाधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या सूचना दिल्या जातात. मात्र, अंतिम निर्णय पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसारच घेतला जातो.
लोकशाहीमध्ये चर्चा, मतभेद आणि विचारमंथन याला महत्त्व असते. प्रत्येक मुद्द्यावर सर्वांनी सुरुवातीपासून एकच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा लोकशाहीत नसते. उलट विविध पर्यायांचा विचार करून सर्वोत्कृष्ट निर्णय घेण्याची प्रक्रिया हीच मजबूत संघटनात्मक व्यवस्थेची ओळख मानली जाते.
विरोधकांकडून राजकीय कथानक?
भाजपामधील मतभिन्नतेला “गटबाजी” म्हणून सादर करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचे पक्षाचे मत आहे. महापालिकेत भाजपाला स्पष्ट बहुमत असल्याने सत्ताधारी पक्षाच्या प्रत्येक निर्णयावर राजकीय भाष्य होणे स्वाभाविक आहे. मात्र, कोणत्याही अधिकृत बैठकीत किंवा संघटनात्मक पातळीवर नेतृत्वाविरोधात बंड, फूट किंवा संघर्ष झाल्याचे एकही उदाहरण समोर आलेले नाही.
याउलट, महत्त्वाच्या सर्व निर्णयांमध्ये शहराध्यक्ष, आमदार, महापौर, सभागृह नेते आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी एकत्रितपणे भूमिका निश्चित करत असल्याचा दावा भाजपाने केला आहे. विशेष म्हणजे, सभागृहात आणि सभागृहाबाहेर प्रत्येक सदस्य आपले मत स्वतंत्रपणे मांडत असतो. पक्षाचा ‘व्हीप’ असतानाही आम्ही पदाधिकारी म्हणून त्यांच्या मतांचे स्वागत करतो. याचा अर्थ आमच्यात मतभेद किंवा अंतर्गतकलह आहे, असा होत नाही.
शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांची स्पष्ट भूमिका
“भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नाही. पक्षाची कोअर कमिटी एकत्रित निर्णय घेते. त्याची अंमलबजावणी करण्यात येते. विविध विषयांवर चर्चा होणे ही संघटनात्मक प्रक्रिया आहे. त्याचा अर्थ अंतर्गत संघर्ष असा होत नाही.”
To The Point
- महापालिकेतील चर्चांना ‘गटबाजी’चा रंग देणे चुकीचे.
- भाजपामध्ये सर्व महत्त्वाचे निर्णय कोअर कमिटीमध्ये सामूहिकपणे घेतले जातात.
- मतभिन्नता ही लोकशाही प्रक्रियेचा भाग; अंतिम निर्णय मात्र पक्षाचा एकमताने.
- कायदेशीर अडचणी लक्षात घेऊन प्रस्तावात बदल करणे ही जबाबदार प्रशासनाची भूमिका.
- विरोधक राजकीय फायद्यासाठी समन्वयाच्या प्रक्रियेलाच ‘अंतर्गत संघर्ष’ म्हणून रंगवत असल्याचा भाजपचा आरोप.
- भाजपाचे संघटनात्मक नेतृत्व, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी विकासाच्या अजेंड्यावर एकत्रितपणे काम करत असल्याचा पक्षाचा दावा.





