ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शून्य कचरा प्रकल्पातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गटास ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्कार

पिंपरी | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कचरा (झिरो वेस्ट स्लम)’ उपक्रमामध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल श्रीकृष्ण महिला बचत गट यांना ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार आसरा सोशल फाऊंडेशन, पुणे आणि ओम पब्लिकेशन, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित ‘उत्कर्ष भारत सन्मान सोहळा – २०२६’ या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. यावेळी बचत गटाला अभिनेते विजय गोखले व प्रसिद्ध साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बचत गटाच्या अध्यक्षा मंगल वाडकर तसेच अश्विनी चौधरी यांनी हा सन्मान स्विकारला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने झोपडपट्टी भागांमध्ये स्वच्छता, कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण, ओला व सुका कचरा वेगळा संकलित करणे, पुनर्वापर व पुनर्चक्रणाला चालना देणे तसेच परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्यासाठी ‘शून्य कचरा झोपडपट्टी’ या प्रकल्पास १६ ऑगस्ट २०२२ रोजी सुरूवात झाली. हा प्रकल्प देशातील पहिला शून्य कचरा झोपडपट्टी प्रकल्प असून यामध्ये स्थानिक महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे. त्यांच्यामार्फत घराघरांत जनजागृती, कचरा वर्गीकरण, संकलन आणि परिसरातील स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

या प्रकल्पाची सुरुवात गवळीमाथा झोपडपट्टी परिसरात करण्यात आली होती. या ठिकाणी श्रीकृष्ण महिला बचत गटाने अत्यंत जबाबदारीने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांद्वारे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण केली. घराघरांत जाऊन कचऱ्याचे स्रोतावर वर्गीकरण करण्यासाठी जनजागृती, नियमित कचरा संकलन, स्वच्छता राखणे आणि नागरिकांचा सहभाग वाढविणे या कामांमध्ये बचत गटाने उल्लेखनीय योगदान दिले. त्यांच्या कार्यामुळे या उपक्रमाला यश मिळाले असून इतर झोपडपट्टी भागांसाठीही हा प्रकल्प प्रेरणादायी ठरला आहे.

हेही वाचा

To The Point: ‘माय वे ऑर द हायवे’; राष्ट्रवादीत पार्थ पवारांचे ‘सुपर पॉवर सेंटर’!

महिला सक्षमीकरण, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेबाबत समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्याची दखल घेत श्रीकृष्ण महिला बचत गटाला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

स्वच्छ शहर, निरोगी पर्यावरण आणि शाश्वत विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. या उपक्रमात महिला बचत गटांनी घेतलेली पुढाकाराची भूमिका विशेष उल्लेखनीय असून त्यांनी केवळ कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे राबविले नाही, तर नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करून सामाजिक परिवर्तनाची चळवळ उभी केली आहे. हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीचा, समर्पणाचा आणि सामाजिक बांधिलकीचा गौरव आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या महानगरपालिकेच्या प्रयत्नांना अशा महिला बचत गटांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. हा सन्मान इतर महिला बचत गटांनाही प्रेरणा देणारा ठरेल, असा मला विश्वास आहे.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कचरा’ उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही दखल अत्यंत अभिमानास्पद आहे. ‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य अनुकरणीय आहे. स्थानिक महिला बचत गटांच्या सहभागातून शून्य कचरा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येतो, हे श्रीकृष्ण महिला बचत गटाने आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button