Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आम्ही पांढऱ्या पँटला गवत लावून..; संजय राऊतांचा शिंदेंना टोला

मुंबई | मुंबईसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्या असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात सर्वच प्रमुख पक्षांत नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. अनेक ठिकाणी जागावाटप निश्चित न झाल्याने, तर काही ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या महायुतीच्या जागावाटपावर ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना, शिंदे गटावर आणि भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधला.

मुंबईत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असून, भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती झाली आहे. सोमवारी रात्री उशीरा निश्चित झालेल्या जागावाटपानुसार भारतीय जनता पक्ष मुंबईत १३७ जागा लढवणार असून, शिंदे गटाच्या शिवसेनेला ९० जागा देण्यात आल्या आहेत. उर्वरित मित्रपक्षांना या दोन्ही पक्षांकडून त्यांच्या कोट्यातून जागा देण्यात येणार आहेत.

हेही वाचा     :          पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या टीमकडून आंतरराज्य गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश 

खासदार संजय राऊत म्हणाले, आत्तापर्यंत मुंबईत शिवसेना भाजपाला जागा देत होती. आता काय पाळी आली आहे बघा. स्वत:ला शिवसेना म्हणवून घेणाऱ्यांना भाजपाच्या दारात जागा मागत उभं राहावं लागतं. त्यांनी फेकलेल्या जागांवर यांना निवडणूक लढवायची आहे. गेल्या ६० वर्षांत शिवसेना मुंबईत कधी कुणाच्या दारात उभी राहिली नाही. पण शिंदेंचा गट युती व्हावी म्हणून अमित शाहांच्या दारात गेले. आता भाजपानं त्यांना लढण्यासाठी जागा दिल्या. हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणं आहे.

आम्ही शिवसेना आहोत. आम्ही सन्मानानं आघाडी केली आहे. मुंबईत १४० च्या आसपास जागा आम्ही लढत आहोत. राज ठाकरेंचा पक्षही मोठ्या प्रमाणावर जागा लढवतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही जागा देत आहोत. भाजपाच्या जागांवर लढणारी शिंदेंची शिवसेना खरी का? हे जनता ठरवेल, असं संजय राऊत म्हणाले.

२०१७ ला भाजपाची तेव्हाची भूमिका फेटाळून आम्ही स्वतंत्र लढलो. याला स्वाभिमान म्हणतात. जेव्हा जेव्हा भाजपानं अशी अडेलतट्टूपणाची भूमिका घेतली, तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वबळावर लढली आहे. पण लाचारी पत्करली नाही. आम्ही अमित शाहांच्या दारात जाऊन गवतावर बसलो नाही आणि सफेद पँटला गवत लावून परत आलो नाही. आम्ही लढलो. पण आता चित्र वेगळं दिसतंय. त्यांनी ताबडतोब स्वत:ला शिवसेना म्हणवून घेणं बंद केलं पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button