मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा काही संबंध नाही, चंद्रपूर पराभवावर बावनकुळेंचे भाष्य

नागपूर : राज्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने एकूण विजयानंतर नंबर वन पक्ष म्हणून आपली छाप सोडली, तरी चंद्रपूरमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. या पराभवानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा काही संबंध नसतो आणि पराभवातून आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.
बावनकुळे म्हणाले की, “सुधीर भाऊंची भावना योग्य आहे, मात्र तांत्रिकदृष्ट्या मंत्रिपद असते तर जिंकलो असतो असे नाही. आम्हाला थोडे बळ, पाठबळ दिले पाहिजे ही भावना मुनगंटीवारांची आहे, आणि देवेंद्र फडणवीस कायम त्यांना पाठबळ देतात. आता यावेळी ते मंत्री बनू शकले नाहीत, तरी सुधीरभाऊ महाराष्ट्राचे नेते आणि माजी अध्यक्ष आहेत. राज्यातील जनतेला त्यांचे नेतृत्व मान्य आहे.”
हेही वाचा – शनिशिंगणापूरप्रमाणे आमच्या पक्षालाही दरवाजे नाहीत : भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचे वक्तव्य व्हायरल
त्यांनी पुढे सांगितले की, चंद्रपूर आणि वर्धा येथे अपेक्षित यश आलेले नाही आणि त्यामुळे आत्मचिंतनाची गरज आहे. “पराभवातून शिकणे आणि पुढे जिंकणे हेच महत्त्वाचे आहे. सुधीरभाऊंसह आम्ही चर्चा करू, आत्मचिंतन करू आणि पुढच्या निवडणुकीत चंद्रपूर महापालिका जिंकू शकतो,” असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे यांनी भाजपच्या एकत्रित विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वास दिले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांना सोबत घेतले आणि त्यांनी निवडणूक प्रभारी जबाबदारी दिली. विदर्भात १०० पैकी ५९ नगराध्यक्ष भाजपचे झाले, तर राज्यात जवळपास साडेतीन हजार लोकप्रतिनिधी भाजपच्या पक्षातून निवडून आले आहेत. बावनकुळे म्हणाले की, विकासाच्या दृष्टिकोनातून जनतेने डबल इंजिन सरकारचे समर्थन केले असून भाजपला सर्वाधिक यश मिळाले आहे.





