Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमुंबई

मराठा आंदोलनावर उच्च न्यायालयाची कडक भूमिका ….

मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटलांना नोटीस

Share On

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनावर आता पोलिस आणि न्यायालय दोन्हींकडून कडक कारवाई सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिलेल्या आदेशानंतर, मुंबई पोलिसांनी आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले की, आझाद मैदान वगळता मुंबईतील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आंदोलक उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच रेल्वे स्थानके, उड्डाणपूल, आणि सार्वजनिक रस्ते तातडीने मोकळे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याच पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या कोअर कमिटीला नोटीस पाठवून आझाद मैदान रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी नोटीसमध्ये नमूद केले आहे की, आंदोलनासाठी केवळ पहिल्या दिवशीच परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर कोणतीही वैध परवानगी न घेता आंदोलन सुरू ठेवण्यात आले, तसेच न्यायालय व पोलिसांच्या अटी व शर्तींचे उल्लंघन झाले आहे.

यासोबतच, मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी केलेल्या काही वक्तव्यांचीही दखल घेण्यात आली असून, त्या अनुषंगानेही कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.

व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान मुंबई

या आंदोलनामुळे शहरातील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शाह यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “वाहतूक कोंडी, गर्दी आणि रस्ते बंद यामुळे आमच्या व्यवहारांवर गंभीर परिणाम झाला आहे. रविवारी विकेंड असूनही विक्री अत्यंत कमी झाली. व्यावसायिक बैठका पुढे ढकलाव्या लागल्या असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.”

CSMT परिसरात कडक बंदोबस्त

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरात पोलिसांनी भारी बंदोबस्त लावला आहे. आंदोलकांना केवळ भूयारी मार्गाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, रेल्वे स्थानकातून आंदोलकांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, जे जे उड्डाणपूलाचा मार्गही पोलिसांनी रिकामा करून घेतला आहे.

पुढील वाटचालीकडे लक्ष

मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान तातडीने रिकामे करण्याची नोटीस देण्यात आली असली तरी, आंदोलन मागे घेण्याबाबत कोणताही निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येत्या काही तासांत आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button