बेस्ट निवडणूक : ‘ठाकरे’ ब्रँडचा भोपळा; भाजप-शशांक राव पॅनलचा दणदणीत विजय!
संजय राऊत म्हणाले, “मी दिल्लीत होतो...” : भाजपाच्या प्रसाद लाड यांनी घेतला खरपूस समाचार

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या बेस्ट क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ‘उत्कर्ष पॅनल’ला मोठा धक्का बसला आहे. या पॅनलचा एकही उमेदवार निवडून न आल्याने ‘ठाकरे’ ब्रँडची विश्वासार्हता मोठ्या प्रश्नचिन्हासमोर उभी राहिली आहे.
या निवडणुकीत समृद्धी पॅनलने सर्व 21 जागांवर विजय मिळवत एकहाती वर्चस्व गाजवले. बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांचा पॅनलने 14 जागांवर विजय मिळवला, तर भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनलने 7 जागा पटकावल्या. ठाकरे गट आणि मनसे यांच्या एकत्रित उत्कर्ष पॅनलला मात्र एकही जागा जिंकता आली नाही.
‘ठाकरे’ ब्रँड फेल? संजय राऊत म्हणतात, “निकाल माहित नाही”
या धक्कादायक पराभवावर खासदार संजय राऊत यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. “मी दिल्लीत होतो, निकाल काय लागलेत याची मला माहिती नाही,” असं सांगत त्यांनी या पराभवाकडे गांभीर्याने न पाहिल्याचं सूचित केलं. राऊत पुढे म्हणाले, “या निवडणुका ट्रेड युनियनच्या ताकदीवर लढल्या जातात. याला फार राजकीय महत्त्व द्यायचं कारण नाही. ठाकरे ब्रँड कधीच फेल होत नाही.”
भाजपचा टोला – “21 समोर 0, आता तरी हवेतून खाली या”
बेस्ट निवडणुकीतील या पराभवानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांनी ‘ठाकरे ब्रँड’वर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “बेस्ट इलेक्शनमध्ये ठाकरे ब्रँड 21 समोर 000” अशी खोचक टिप्पणी केली. त्याचबरोबर, “00/21 म्हणजे ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकू शकले नाहीत, आता तरी हवेतून खाली या”, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
निवडणुकीत नेमकं काय घडलं?
समृद्धी पॅनल: सर्व 21 जागा जिंकल्या
शशांक राव यांचा प्रभावी विजय: 14 जागा
भाजप (प्रसाद लाड पॅनल): 7 जागा
उद्धव ठाकरे गट + मनसे (उत्कर्ष पॅनल): 0 जागा
या निवडणुकीसाठी बेस्टमधील पाच मोठ्या युनियन्स एकत्र येऊन ‘समृद्धी पॅनल’ स्थापन केला होता, तर मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या उत्कर्ष पॅनलने आपली ताकद पणाला लावली होती. मात्र निकाल ठाकरेंच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक ठरला आहे.
राजकीय संकेत स्पष्ट?
बेस्ट निवडणुकीत मिळालेला हा दणका मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ‘ठाकरे’ ब्रँडसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. सामान्य कामगारांमध्ये ठाकरे गटाचा प्रभाव कमी झाल्याचे हे स्पष्ट लक्षण मानले जात आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, या पराभवामुळे ठाकरे आणि मनसेला आपली रणनीती पुन्हा एकदा तपासण्याची गरज आहे.





