न्यू इंग्लिश मीडियम स्कूल थेरगावच्या ६ खेळाडूंची राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदकांवर मोहर; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी):
सातारा येथील वाई येथे पार पडलेल्या १४ व्या राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगावच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. २२ आणि २३ ऑगस्ट रोजी आयोजित या स्पर्धेत शाळेतील ६ खेळाडूंनी सहभाग नोंदवून पदकांची लयलूट केली असून, सर्वांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेत आपापल्या वजन गटात उत्कृष्ट कौशल्य दाखवत स्वयंम माने, शाम माळी, उत्तम भाटी आणि भाग्यश्री गायकवाड यांनी सुवर्णपदक पटकावले. तर संजू भाटी व सार्थक मोरे यांनी चमकदार कामगिरी करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. या सर्व विजेत्या खेळाडूंची येत्या नोव्हेंबर महिन्यात शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रीय युनिफाईट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
हेही वाचा – रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी ज्ञान अनिवार्य; मुंबईत नियमाच्या अंमलबजावणीवरून वाद
खेळाडूंच्या या घवघवीत यशामुळे थेरगाव परिसरासह संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक यशवंत माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार सर, सचिव अशोक मोरे सर, खजिनदार सुरेखा पवार मॅडम, संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, मुख्याध्यापिका विद्या नाईक मॅडम, अग्निस मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष अभिनंदन केले असून पुढील राष्ट्रीय स्पर्धेतील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
”राज्यस्तरीय युनिफाईट स्पर्धेत आपल्या ‘न्यू इंग्लिश मीडियम स्कूल’च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अत्यंत अभिमानास्पद आहे. खेळाडूंचे हे यश त्यांची मेहनत आणि प्रशिक्षकांचे अचूक मार्गदर्शन यांचे फलित आहे. क्रीडा क्षेत्रातही आपल्या शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत, याचा मला संस्थाचालक म्हणून मनस्वी आनंद आहे. सुवर्ण व रौप्य पदक विजेत्या सर्व खेळाडूंचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि नोव्हेंबर महिन्यात शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्यांना संपूर्ण संस्थेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो.”
— श्री. विजय पवार
(संस्थापक अध्यक्ष, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, थेरगाव)





