चाकणच्या विकासाला मिळणार गती; उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून आढावा
सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना

उच्चस्तरीय समितीच्या रोडमॅपला शासनाचे पूर्ण सहकार्य
पुणे | चाकण औद्योगिक परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिल्या. चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेताना त्यांनी समितीच्या रोडमॅपची माहिती जाणून घेतली.
चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही सुरू केली आहे. समितीच्या कामाला आवश्यक ते सहकार्य केले जाईल, तसेच स्थानिकांच्या मागण्या आणि सूचनांचा विचार करून विकासकामांना गती देण्यात येईल, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
चाकण परिसरातील वाहतूक, पायाभूत सुविधा आणि इतर विविध प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर स्वतंत्रपणे उपाययोजना करण्याऐवजी सर्व संबंधित विभाग आणि संस्थांना एकाच व्यासपीठावर आणून समन्वयाने निर्णय घेणे ही सकारात्मक बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचा
क्रिती सेनॉनच्या रक्षाबंधन जाहिरातीवरून वाद; GIVAने मागितली माफी

उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून प्रश्नांचे प्राधान्यक्रम निश्चित करून त्यानुसार टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे. चाकणच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा रोडमॅप तयार करण्यात आला असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनस्तरावर पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.
या बैठकीस खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे, उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आदी उपस्थित होते.
“चाकण परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. समितीने तयार केलेल्या रोडमॅपनुसार टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येईल आणि आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल.”
– सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री.





