‘उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेबांचा अपमान’; संजय राऊतांचं अमित शाहांना प्रत्युत्तर

मुंबई | भारतीय जनता पार्टीचं अधिवेशन काल शिर्डीमध्ये पार पडलं. या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाषण केलं त्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरेंना गद्दार आणि दगाबाज म्हटलं. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं आहे. अमित शाहांनी बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, की उद्धव ठाकरे किंवा शिवसेना यांनी दगाफटका केलेला नाही. तर भाजपाने गद्दारीला खतपाणी घालण्याचं काम अमित शाह आणि मोदींनी केलं आहे. आता तेच अमित शाह बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आहेत. उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. या वाक्यावर टाळ्या वाजवल्या गेल्या हा महाराष्ट्राचा अपमान आहे.
शरद पवार यांनी अख्खी हयात राजकारण आणि समाजकारण यांच्यासह सार्वजनिक आयुष्यात घालवली. शरद पवार यांनी पद्मविभूषण देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांच्यावर महाराष्ट्रात येऊन सडक्या शब्दांत टीका करणं हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या लोकांना पटलं आहे का? आवडलं आहे का? याचा खुलासा झाला पाहिजे. कुणीतरी बाहेरचे लोक येतात, पदावर असणारे नेते असतील. पण ज्यांनी महाराष्ट्रात येऊन तुम्ही शिवसेनेचा आणि शरद पवारांचा अपमान करता आणि समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. टाळ्या वाजवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्याच सहकाऱ्यांना हे वाटतं आहे की इंडिया आघाडी आणखी बळकट झाली पाहिजे. देशासमोर जे संकट आणि समस्या आहे ती म्हणजे मोदी आणि शाह. संविधानावर हल्ले होत आहेत. हे संकट असताना इंडिया आघाडीने बळकटीने एक राहिलं पाहिजे ही आमची भूमिका आहे, असंही संजय राऊत म्हणाले.





