भारताला मोठा धक्का! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त

Jasprit Bumrah | टी-२० क्रिकेटचा थरार संपल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी क्रिकेटच्या रणसंग्रामासाठी सज्ज होत आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) दृष्टीने ही मालिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडू शकतो, असे वृत्त समोर आले आहे.
बुमराहच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. टी-२० वर्ल्डकपच्या शेवटच्या टप्प्यात त्याला ही दुखापत झाली होती. त्यावेळी बीसीसीआयच्या (BCCI) वैद्यकीय पथकाने त्याला इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार गेल्या महिन्यात त्याने उपचार घेतले, मात्र तो अजूनही पूर्णपणे फिट होऊ शकलेला नाही. संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसबाबत कोणतीही धोका पत्करण्यास तयार नाही. श्रीलंका दौऱ्यासाठी घोषित संघात बुमराहचा समावेश करण्यात आला होता, मात्र त्याचा सहभाग फिटनेसवर अवलंबून होता. बीसीसीआयकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
हेही वाचा
WTC गुणतालिकेच्या दृष्टीने मालिका अत्यंत महत्त्वाची
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ सध्या पाचव्या स्थानावर आहे. अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला ही मालिका जिंकणे अत्यंत गरजेचे आहे. अशा महत्त्वाच्या वळणावर बुमराहचे संघात न असणे ही कर्णधार शुबमन गिल आणि संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंता ठरणार आहे. आता बुमराह बाहेर पडल्यास त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय कसोटी संघ:
शुबमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.





