सेक्टर क्रमांक १२ मधील विद्यार्थी, कामगार व प्रवाशांसाठी निगडी बससेवेचा शुभारंभ
आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बस मार्ग क्र. ३४० ला प्रारंभ

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ मधील सेक्टर क्रमांक १२ च्या परिसरातील विद्यार्थी, कामगार तसेच नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी नवीन निगडी बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनानुसार सुरू करण्यात आलेल्या बस मार्ग क्रमांक ३४० – आळंदी ते निगडी, पीएम आवास योजना, सेक्टर क्रमांक १२ (बी.आर.टी.) या बससेवेचे लोकार्पण करण्यात आले.
सेक्टर क्रमांक १२ आणि परिसराचा वाढता विस्तार, पीएम आवास योजना तसेच परिसरातील विविध सोसायट्या, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक भागात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर नवीन बस मार्ग सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या बससेवेमुळे सेक्टर क्रमांक १२, पीएम आवास योजना परिसरातील नागरिकांना आळंदी, चिखली, मोशी, निगडी तसेच शहरातील विविध भागांमध्ये ये-जा करण्यासाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, कामगार, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही सेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

नवीन बससेवा सुरू झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या बस मार्गामुळे दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि सुकर होण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांनी सांगितले. भविष्यात नागरिकांच्या गरजेनुसार बससेवेची वारंवारता वाढविण्यासह आणखी नवीन मार्ग सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याची अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या लोकार्पण कार्यक्रमाला नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, नगरसेविका नम्रता लोंढे, भाजपा मंडल अध्यक्ष शिवराज लांडगे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, विजय अण्णा चौधरी, चिखली-मोशी सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, ॲड. अतुल कांबळे, अशोक मोरे, बी टाईप सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष बाबाजी कळमकर, ए टाईप सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष स्वप्नील चव्हाण यांच्यासह परिसरातील नागरिक, सोसायटी प्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित होते.
सेक्टर क्रमांक १२ परिसरातील विद्यार्थी, कामगार आणि प्रवाशांसाठी बस मार्ग क्र. ३४० सुरू होणे ही अत्यंत आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे. आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनातून नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध झाली आहे. आळंदी ते निगडी, पीएम आवास योजना, सेक्टर क्रमांक १२ या मार्गामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि किफायतशीर होणार आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला, कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा फायदा होईल.
– डॉ. सुहास कांबळे, नगरसेवक, पिं. चिं. मनपा.





